पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुले जेव्हा सुधारगृहात येतात तेव्हा तेथील बालकल्याण अधिकारी, परीविक्षा अधिकारी, व्यक्ती चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते त्या मुलांची विचारपूस करून त्याचे वर्गीकरण करतात. त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांना कशा प्रकारच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसन सुविधांची गरज आहे, त्याचा विचार करून त्यांच्या भवितव्याचे नियोजन केले जाते.
 अनाथ अर्भके व मुले बालगृहात दाखल होताच प्रथम त्यांच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पोलीस, न्याय, समाजकल्याण खाते, वर्तमानपत्रांचे साहाय्य घेतले जाते. कधी यश येते कधी येत नाही. मुले काही सांगू शकत नसतात. शिवाय ती अशा ठिकाणी टाकून दिलेली असतात की त्यांच्या भूमिगत पालकांचा शोध घेणे मोठे दिव्य असते. सर्वांतून अपयश आले की मग त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न केले जातात. ० ते ५ वयोगटातील अर्भके व बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते. अशी बालके दत्तक घेण्याविषयी सर्व ती मदत व मार्गदर्शन बालगृहात मिळू शकते. अपत्यहीन दांपत्ये यासाठी बालगृहाशी संपर्क साधू शकतात. राज्यातील अनेक संस्थांमार्फत आजवर हजारो बालकांना देशात व परदेशात दत्तक देण्यात आले आहे. ती बालके आज आपापल्या घरी सुखमय जीवन जगत आहेत. दत्तक दिलेल्या बालकांना जन्मजात बालकांचे सर्व कायदेशीर अधिकार मिळत असतात.

 ६ ते १८ वर्षांच्या बालकांसाठी औपचारिक शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या सोयी बालगृहात उपलब्ध असतात. याशिवाय भोजन, कपडालत्ता, बिछाने, शैक्षणिक साहित्य, आरोग्य, मनोरंजन साधने, ग्रंथालय, शुश्रूषागृह, क्रीडांगणासारख्या सोयीही बालगृहात मोफत पुरविण्यात येत असतात. या मुलांचा सांभाळ करण्यासाठी गृहमाता, काळजीवाहक, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आचारी अशा विविध पालकवर्गाची नियुक्ती केलेली असते. ही पालक मंडळी बालकांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करतात. या मुलांचा सांभाळ करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण कर्मचारी-पालकांना देण्यात येत असते. निरीक्षण गृहातील मुदत संपल्यानंतर वर्गीकरणानुसार ही मुले बालगृहे, विशेष गृहे यासारख्या संस्थांमध्ये पाठविली जातात. तिथे मुलांचा १६ वर्षांपर्यंत तर मुलींचा १८ वर्षांपर्यंत सांभाळ केला जातो. या दहा-बारा वर्षांच्या काळात त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला

५०...उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे