पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवश्यक साधन-सुविधा व कर्मचारीयुक्त अनुदानमान्य संस्थांची अग्रक्रमाने स्थापना होणे गरजेचे आहे. येथे औषधोपचार, आहार, रंजन, संगोपन इ.च्या आवश्यक सुविधा व तज्ज्ञ, प्रशिक्षित मातृवत्सल कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसे झाले तर आज या संस्थांतील बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊन अशा बालकांना वरदान मिळू शकेल. शिवाय अशा संस्थांमध्ये महिला समाजसेविकांची सोय असायला हवी. तिच्याकडे अशा मुलांचे वर्गीकरण, चिकित्सा सुविधा उपलब्ध करून देणे, दत्तक पालक मिळवून देणे इ. कामे सोपविता येतील व त्यामुळे संगोपनाबरोबर पुनर्वसन कार्यास गती येईल.
 ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, अपंग मुलामुलींच्या शारीरिक व मानसिक वाढीची गती भिन्न असल्याने त्यांच्या स्वरूपानुसार स्वतंत्र संस्था असायला हव्यात. मुलामुलींच्या बाबतीत अनाथ, बालगुन्हेगार, अपंग, मतिमंद सर्व एकाच प्रकारच्या संस्थांमध्ये ठेवली गेल्याने संस्कार, संसर्ग यांचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. आज कायद्याने अनाथ व वाममार्गी मुलामुलींची स्वतंत्र व्यवस्था बंधनकारक असूनही आर्थिक तरतुदीअभावी हे शक्य होत नाही.
 १८ ते २२ वर्षांपर्यंतचा काळ या मुलामुलींच्या शिक्षण, प्रशिक्षण, स्वावलंबन व पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यास कलाटणी देणारा असतो. यासाठी सुसज्ज अशी पुनर्वसन केंद्र स्थापायला हवीत. आज राज्यात अपवादात्मक आफ्टर केअर होस्टेल्स आहेत. तेथील सुमार सुविधांमुळे मुलामुलींचे सुस्थापन योग्य रितीने होऊ शकत नाही.

 १८ ते ४० वर्षांतील स्त्री-पुरुषांसाठी असलेली स्वीकारगृहे, संरक्षण गृहे, बचाव गृहे ही शासकीय आहेत. ती स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविली जाण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. या काळात प्रशिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह इ.द्वारे पुनर्वसन करण्यावर भर दिला पाहिजे. आज या संस्था तुरुंगासारख्या चालविल्या जातात. आधीच अधांतरी व अंधारमय झालेल्या प्रौढ, परित्यक्त, विधुर, विधवा स्त्री-पुरुषांची आयुष्ये येथे आल्यावर आशेच्या पालवीने प्रफुल्लित व्हायला हवीत. पण तसे घडत नाही. अशा शासकीय संस्थांत स्थानिक समाजकार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग वाढल्यास ही मरगळ दूर होऊ शकेल.

४६...सामाजिक पालक संस्था : अनाथाश्रम