पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री विधवा झाली की तिला पापी समजून निराधार केले जायचे. बालविवाह, विधवा विवाह विरोध इ.मुळे अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांना धार्मिक व सामाजिक मान्यता नसायची. यांच्याबद्दल संस्थात्मक आस्था प्रथम ख्रिश्चन मिशनरींनी व्यक्त केली. ख्रिश्चनांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन प्रथम महात्मा फुले यांनी इ. स. १८६३ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. त्या काळात त्यांनी कुमारी मातांचे संरक्षण, बाळंतपण व त्यांच्या अनौरस समजल्या जाणा-या अर्भकांचे संगोपन करून सामाजिक परिवर्तन घडवून आणले. इतकेच नव्हे, तर काशीबाई नावाच्या विधवेच्या 'यशवंत' या मुलास दत्तक घेऊन एक नवा आदर्श घालून दिला. महात्मा फुले यांच्या या आदर्शभूत कार्याने प्रेरित होऊन प्रार्थना समाज, आर्य समाज, रमाबाई असोसिएशन, लीग ऑफ मर्सी, साल्वेशन आर्मी, असोसिएशन ऑफ मॉरल अँड सोशल हायजिन यांसारख्या संस्था अस्तित्वात आल्या. यातून निर्माण झालेल्या वा. बा. नवरंगे बालकाश्रम (पंढरपूर), शारदा सदन (पुणे), श्रद्धानंद महिलाश्रम (मुंबई) यांनी आपल्या कार्याचे शताब्दी महोत्सव साजरे केले आहेत. या संस्कारापासून प्रेरणा घेऊन चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पुढाकाराने इ. स. १९३७ मध्ये स्थापन झालेल्या हिंदू वुमन्स रेस्क्यू होम सोसायटी'च्या कोल्हापूर येथील ‘करवीर अनाथ महिलाश्रम' या संस्थेने दक्षिण महाराष्ट्रात मोलाचे कार्य करून सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. या संस्थेच्या विकासात प्राचार्य दाभोळकर यांच्या प्रेरणेने खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद होत आहे.

 महाराष्ट्रातील अनाथाश्रमासारख्या संस्था प्रथम खासगी संस्था म्हणून अस्तित्वात आल्या. समाजातील दानशूर व धर्मानुरागी व्यक्तींच्या उदार आश्रयावर हे कार्य सुरू झाले. पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात अनाथ मुले व विधवा स्त्रियांचे प्रश्न समाजापुढे आले. अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसनाच्या प्रश्नास जागतिक चिंतेचा विषय मानले जाऊ लागले ते १९२४ च्या जीनिव्हा परिषदेनंतर. त्या परिषदेत बालकांच्या हक्कांना जागतिक मान्यता देण्याबाबत विचार झाला. यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांनी वेळोवेळी भारतात अनेक सामाजिक कायदे केले. अशा कायद्यात ‘मुंबई मुलांचा कायदा (१९२४) एक होता. पुढे स्वातंत्र्यानंतर 'वुमेन्स अँड चिल्ड्रेन्स इन्स्टिट्यूशन

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...४३