पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सामाजिक पालक संस्था : अनाथाश्रम


 आपल्या समाजात अनाथ, निराधार, पोरकी, मुले, मुली व परित्यक्ता महिला असतात. आई-वडील वारल्याने अथवा जवळचे कुणीच नातलग नसल्याने ती निराधार असतात. व्यक्तिगत पालक नसले की समाजच पालक होत असतो. दुःखी माणसास आधार ही आपल्या संस्कृतीची परंपरा जुनी आहे. भूतदयेचा संस्कारही आपल्या विकासाचा मूळ पाया आहे. ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,' अशी भावना आपल्या समाजात पूर्वीपासूनच रूढ आहे. अशा सहिष्णुतेच्या भावनेतून ‘अनाथाश्रम' संस्था उदयास आल्या. या संस्थांना प्रारंभ झाला व्यक्तिगत पातळीवर. प्राचीन ऋषीमुनींनी समाजसेवी भावना प्रथम जोपासली. कण्व मुनींनी शकुंतलेचा केलेला सांभाळ सर्वांना माहीत आहे. पुढे हे प्रयत्न सामूहिकपणे झाले व त्यांना संस्था रूप आले व त्यातून अनाथाश्रम स्थापन झाले.
 अनाथाश्रमासारख्या संस्थांचा प्रारंभ धार्मिक भावनेने झाला. पुढे त्याला समाजसुधारकांच्या चळवळीची जोड मिळाली. भारतातील अनाथ, निराधारांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यावर ख्रिश्चन मिशनरी लोकांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. इंग्लंडमध्ये हे कार्य पंधराव्या शतकात खासगी पातळीवर सुरू झाले. इ. स. १६०१ मध्ये तिथे ‘पुअर लॉ' अंमलात आला व सर्व अनाथ निराधारांचे संगोपन करणाच्या संस्था सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या. खासगी व धार्मिक स्वरूपात सुरू झालेल्या या कार्यास शासकीय साहाय्य व मान्यता मिळू शकते, हे कळल्यावर जगभर हे कार्य सामूहिक व संस्थात्मक पातळीवर सुरू झाले.

 महाराष्ट्रापुरते बालायचे झाले तर येथील अनाथाश्रम प्रथम ख्रिश्चन मिशनरींनी सुरू केले. समाजात धार्मिक कट्टरपणा होता. कुमारी मातांच्या मुलांना अनौरस समजण्यात येत असे. अशा मातांना बहिष्कृत मानण्यात यायचे. ब-याचदा एखादी

४२...सामाजिक पालक संस्था : अनाथाश्रम