पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असले, तरी हे नियम ज्या संस्थांमध्ये राबविले जायचे आहेत, या नियमांचा ज्यांच्या कार्याशी प्रथम संबंध आहे, त्या संस्थांना अद्याप मिळालेले नाहीत. विधानसभेपुढे मांडण्यापूर्वी ही नियमावली समाजकल्याण विभागाने संबंधित घटकांना द्यायला हवी. राजपत्रात प्रकाशित केल्याने शासनाची तांत्रिक जबाबदारी संपते, हे जरी खरे असले तरी या नियमावलीचा संबंध राज्यातील विविध बालकल्याण संस्थांमधील सुमारे २५,००० अनाथ, निराधार, बालगुन्हेगार बालकांच्या जीविताशी असल्याने, ती सर्व संबंधित घटकांकडे पाठवून सूचना मागवाव्यात. या नियमावलीत मूलभूत स्वरूपाच्या त्रुटी राहून गेल्याने असे करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य मानले जावे. राजपत्र सर्वसामान्यांना उपलब्ध होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

 या नियमावलीचा एक स्वागतार्ह भाग असा की ‘बाल न्याय अधिनियम १९८६' मधील तरतुदींच्या अनुषंगाने विस्ताराने व सूक्ष्म अभ्यास करून नियम करण्यात आले आहेत. ज्या त्रुटी दिसून येतात त्यांचा संबंध प्रामुख्याने आर्थिक तरतुदींशी दिसून येतो. हा कायदा राष्ट्रीय पातळीवर अमलात आणण्याची घोषणा केली तेव्हा याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राज्यांना केंद्र शासनाने अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शविली होती. असे असेल तर केवळ निधी उपलब्ध नाही म्हणून या कायद्याच्या मूळ उद्दिष्टासच बगल देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. ही नियमावली या क्षेत्रात काम करणाच्या सामान्य कार्यकत्र्यांपर्यंत पोहोचावी म्हणून ती मराठीत उपलब्ध करून द्यायला हवी. जोपर्यंत हा कायदा त्याचे नियम व त्या अनुषंगाने शासकीय खर्चाने होणारे परिसंवाद राजभाषा मराठीमध्ये होणार नाहीत तोवर या कायद्याविषयी जनजागृती व जनसहभाग मिळणे केवळ अवघड. असे झाले तरच सामान्य कार्यकर्ताही याबाबतचा आपला अभिप्राय देऊ शकेल. अन्यथा, पुण्या-मुंबईसारखी शहरे, तेथील वृत्तपत्रे, तेथील उच्चभ्रू व उच्चपदस्थ अधिकारी, पदाधिकारी व समिती केंद्रीत काम करणारे तथाकथित समाजसेवक यांच्या अभिप्रायावरच रायगड, सिंधुदुर्ग चंद्रपूर, भंडारा येथील सदैव समस्येने घेरलेल्या संस्था नि तेथील बालकांचे भवितव्य ठरवण्याचा केविलवाणा प्रयोग होईल. नियमावलीत ठळकपणे दिसून येणा-या त्रुटींचा विचार आगामी ओळीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...३१