पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपले म्हणणे मांडायची मुभा आहे. उपरोक्त कारणांनी ताटातूट झालेल्या कुटुंबास मुलांच्या कल्याणार्थ एकत्र येण्याचा हक्क मान्य करण्यात आला आहे. शिक्षा, दंड न होता माणुसकीच्या आधारावर मुलांना पालक मिळवून देणे अनिवार्य मानले गेले आहे. वेगवेगळ्या देशात राहणा-या आपल्या आई-वडिलांशी सतत संबंध, संपर्क ठेवण्याचा बालकांना हक्क आहे. कोणत्याही बालकास बेकायदेशीररीत्या विदेशी पाठवण्यास वा ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
 ज्या बालकांमध्ये मत व्यक्त करण्याची कुवत येते, त्यांना ते व्यक्त करण्याचा हक्क आहे. मुलांचे विचारस्वातंत्र्य मान्य केल्यामुळे, ‘तुला काय कळतं? मी सांगतो ते ऐक मुकाट्यानं, नाही तर चालता हो' सारखे नित्याचे घरोघरी ऐकू येणारे संवाद आता बंद व्हायला हवेत. मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याची, योग्य असेल तर ते स्वीकारण्याची सोशिकता, सहिष्णुता पालकांनी, शिक्षकांनी दाखवणे आता काळाची गरज झाली आहे. हे सारं करत असताना पालक योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट, इष्ट-अनिष्ट, वैध- अवैध याबाबतचं मार्गदर्शन जरूर करू शकतात पण त्यांना मुलांवर आपली मतं व मूल्ये खचितच लादता येणार नाहीत.
 हे ऐकून तर आपणा सर्वांना आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही याची मला खात्री आहे की बालकांना आता संघटना करण्याचा, संघटना कार्यात शांततापूर्ण मार्गांनी भाग घेण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे. बालपणी जर लोकशाही रुजली तरच ती प्रौढपणी प्रगल्भ होणार, हे तत्त्व या मागे आहे. मुलांना शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने मागणी करणे, निवेदन देणे, मिरवणूक/मोर्चा काढणे, निदर्शने करणे, धरणं धरणे या सर्व गोष्टींची मुभा आहे.

 आपणाला जसं आपलं खासगी आयुष्य असतं, ते हवं असतं, तसं मुलांनाही. आणि म्हणून बालकांना त्यांचे खासगी आयुष्य जपण्याचा हक्क आहे. मुलांच्या खासगी आयुष्यात, पत्रव्यवहारात पालकांनी, तिन्हाईतांनी अनाहूतपणे, अनाधिकारपणे, अकारण ढवळाढवळ करू नये. मुलांच्या वस्तूंना हात लावणं, त्यांच्या माघारी त्यांचे साहित्य, खोली धुंडाळणं, त्यांचे फोन ऐकणं, त्यांची पत्रं फोडणं, त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पा, टप्पा, सहली, कार्यक्रमात अनावश्यक लुडबुड टाळणे मुलांना आवडेल व आवडते. शक्यतो मुलांना स्वतंत्र खोली देणे,

१८...बालकांचे हक्क व आपली कर्तव्ये