पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अनाथांची जात आणि धर्म


 समाज धारण करतो तो धर्म! धर्माचा अर्थ कालपरत्वे बदलत गेला आहे. ‘सत्यं वद, धर्म चर ' सारख्या सूत्रांनी धर्माला आचरणकेंद्रित बनवला आहे. मधल्या काळात धर्म वर्णाश्रमकेंद्रित झाला आणि मग तो कर्मकांडात गुंतला. झरथुष्ट्र, मोझेस, कन्फ्यूशियस, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यासारख्या वेगवेगळ्या धर्मगुरूंनी जे उपदेश केले त्यांची बैठक ईश्वरी साक्षात्काराची असल्याने धर्म आणि ईश्वराचं अद्वैत निर्माण झालं. धर्म इहलोकापेक्षा परलोककेंद्रित झाला. पारलौकिक सुख हे धर्माचे उद्दिष्ट बनलं. धर्म इहलोकापेक्षा परलोककेंद्रित झाला. पारलौकिक सुख हे धर्माचे उद्दिष्ट बनलं. धर्म परस्वाधीन झाला आणि धर्मगुरू, मल्ला-मौलवी, पुरोहित सांगतील तो प्रमाण धर्म बनला. संतोष, क्षमा, अचौर्य, शुचित्व, निग्रह, शिज्ञास, सत, अक्रोध यासारख्या सदाचारी तत्त्वे बाह्माचारकेंद्रित झाली, परधर्म सहिष्णुता लोपली : स्वधर्माभिमान वाढला आणि प्रत्येक धर्माचं स्वरूप विशिष्ट उपासना संप्रदाय एवढंच राहिलं.

 या अशा स्थितीत समाजात अशी काही माणसं असतात जे कुठच्याच धर्माचा वारसा सांगू शकत नाहीत. जन्मत: प्रत्येक मनुष्याच धर्म,जात, वर्ण मुक्त असतो. परंपरापालनाने, जन्मानंतर या गोष्टी त्याला चिकटवल्या जातात. या अशा स्थितीत अनाथाश्रमात वाढणाच्याचा धर्म कोणता? त्यांचा धर्म ‘मनुष्यधर्म'च असतो. त्याची जात ‘मनुष्य' हीच असते. अनाथाश्रमात, रिमांड होममध्ये जन्मलेली, आलेली, सोडलेली, टाकलेली मुलं याचा कोणताच पूर्ण संदर्भ असत नाही. ती फक्त मनुष्याच्या जातीचे प्रतिनिधित्व करतात. पण आपल्या प्रचलित समाजरचनेत त्याची एवढीच ओळख पुरेशी नसते. कायद्याप्रमाणे रजिस्टरमधील धर्म-जातीचे रकाने भरण्यासाठी या मुलांना पोस्टाच्या तिकिटाप्रमाणे धर्म-जातीची लेबलं चिकटवली जातात. जन्मदाखला, शाळा-प्रवेश, रेशनकार्ड,ओळखपत्र,

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१७५