पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मयुद्धाच्या भावनेने यात सहभागी होणे आवश्यक आहे.
 भारतापुरते बोलायचे झाले तर काडेपेटी, फटाके, हि-याचे घासकाम व पैलू पाडणे, गालीचा तयार करणे,काचकाम,पाटीकाम,तांबाकाम, बांधकाम, विडी उद्योग, कुलपे बनवणे, वस्त्रोद्योग, कुटिरोद्योग, शेतीकाम, घरकाम, उपाहारगृहे, रस्तेबांधणी, खुदाई अशा अनेक उद्योगांत १४ वर्षांच्या आतील मुले-मुली बालकामगार म्हणून कार्यरत आहेत.भारताची विद्यमान लोकसंख्या साडेसत्त्याण्णव कोटी आहे. पैकी दोन कोटी बालमजूर आहेत. परिस्थितीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या या मुलांचे आई-वडील आर्थिक स्थितीने हतबल आहेत. शासनामध्ये यांच्याबद्दल गांभीर्याने योजना करण्याची तीव्र इच्छाशक्ती नाही. परिणामी बालकामगारांचे रूपांतर प्रौढ कामगारांत होते आहे. ‘मानव संसाधन विकास' नावाचे मंत्रालय स्थापून आर्थिक तरतूद, कृ ती कार्यक्रम, अंमलबजावणी यंत्रणा (सक्तीच्या कर वसुली संचालनालयासारखी) असेल तरच बालमजुरांना त्यांचे सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य बहाल होईल.

 मुले ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' म्हणू शकतील, असे वातावरण निर्माण करण्याची हाक ही विश्वत्राता देते आहे. खरं तर हा या देशातील दोन कोटी उपेक्षित बालमजुरांचा टाहो आहे. 'अहा ते सुंदर दिन हरपले, मधुभावांचे वेड जयांनी जिवाला लाविले' असे गुणगुणत येईल, असे बालपण आजच्या बालकांना देणे, आश्वस्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी बालमजुरांसाठी अंशकालिक स्वतंत्र लढा, बालमजुरांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य योजना, बालमजुरांसाठी अरोग्य संवर्धन कार्यक्रम, बालरंजन केंद्र असे विविध उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे जपानमध्ये निर्माण करण्यात आलेल्या कार्य संस्कृती' (Work-Culture) च्या धर्तीवर आपल्या समाजरचनेची पुनर्बाधणीपर्यंतचा पल्ला आपणास गाठावयाचा आहे. प्रवास लांबचा आहे. हे खरे आहे. 'नित्य वदावे, काशीस जावे' असा ध्यास घेतला तरच काशीला जाणे घडते. सामाजिक मोक्षाच्या कल्पनेस ‘ सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्ती अपेक्षित आहे. आपण बालमजुरांच्या मुलांपासून जर याची सुरुवात केली तर एकविसावे शतक ‘दास्यता मुक्त शतक' म्हणून साजरे करू शकू. या विश्वयात्रेत त्यासाठी आपण सर्व हातात हात घालू. खांद्यास खांदा भिडवू व मुलांसाठी दोन पावलं पुढे चालू ! या, सामील व्हा!

१७४...बालमजुरी आणि समाज जागृती