पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्र तीन वाहिन्यांत कूच करते आहे. पैकी आशिया वाहिनी विश्वयात्रेने भारत आगमनापूर्वी फिलिपाइन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, बांगला देश, नेपाळ आदी देशांचा दौरा पूर्ण केला आहे. या विश्वयात्रेत बालमजुरी प्रथेतून मुक्त केलेली २५ मुले-मुली (२५० लक्ष बालकामगारांचे प्रतिनिधी म्हणून) सहभागी आहेत. ती आशिया खंडातील विविध देशांतील होत. त्यांच्याबरोबर संयोजक सात हजार स्वयंसेवी संस्थांचे सत्तर प्रतिनिधी आहेत. यामुळे जगभर बालमजुरीची सद्य:स्थिती कळण्यास साहाय्य होते. विसाव्या शतकातील समाजपरिवर्तनाची सर्वाधिक मोठी चळवळ म्हणून विश्वयात्रेचे आगळे असे महत्त्व आहे.

 बालमजुरीविरोधी जाणीव-जागृतीच्या उद्देशाने योजलेली ही विश्वयात्रा बालकांच्या हक्कांविषयी समाजात जागृती निर्माण करू इच्छिते. ही यात्रा जागातील ज्या निवडक शहरात जाते (त्यात कोल्हापूर एक होय!) तिथे प्रबोधन फेरी, मेळावे, पत्रकार परिषद,लोकसंवाद करते. बालमजुरी प्रथेच्या समूळ उच्चाटनासाठी सार्वत्रिक साक्षरतेचा या विश्वयात्रेचा आग्रह आहे. भारतात सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी लोकसंख्या नियमन व साक्षरता प्रसार असे उभयपक्षी परिवर्तन प्रयत्न केले गेले तरच या देशाचे बालपण आपण सोनेरी करू शकू. ही विश्वयात्रा या संदर्भात सर्व भारतीयांना अंतर्मुख करील. राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्याचे कार्य ही विश्वयात्रा या संदर्भात करण्याचा प्रयत्न करेल.आशिया खंडातील अनेक देश संरक्षणाच्या तुलनेत बालकल्याणावर फारच कमी तरतूद करतात व तरतुदीपेक्षा प्रत्यक्ष खर्च नेहमीच कमी असतो, ही जगजाहीर गोष्ट आहे. कालच ब्रिटनच्या संसदेने पाकिस्तानच्या वाढत्या संरक्षण खर्चाच्या तुलनेत कल्याणकारी कृती. कार्यक्रमांवर सतत कपात करण्याच्या धोरणाची गंभीर नोंद घेऊन आपले साहाय्य बंद करण्याचा दिलेला इशारा हा या विश्वयात्रेचाच परिणाम होय किंवा अगदी आपल्या घरात बघायचे झाले तर युतीच्या शासनाने ‘राळेगणसिद्धी' प्रयोगाच्या धर्तीवर जी ‘आदर्श गाव' योजना जाहीर केली आहे त्यात ‘बालमजुरीमुक्त गाव' हा एक निकष ठेवला आहे, हे राजकीय इच्छाशक्तीचेच प्रतिबिंब होय. या विश्वयात्रेच्या निमित्ताने बालमजुरी प्रथा दृढमूल करणाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रवृत्ती व विचारधारांच्या विरोधात जनमत संग्रह व संघटनास मोठे साहाय्य होणार असल्याने बालक कल्याणाविषयी कृतिशील आस्था असणाच्या सर्व घटकांनी

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१७३