पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बालमजुरी आणि समाज जागृती


 मला आठवतं, पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियात जनआंदोलनाच्या रेट्यामुळे जुलमी झारशाहीचा अस्त होऊन १९१७ ला जनसत्ता अस्तित्वात आली. नव्या समाजरचनेच्या ध्यासातून झारशाहीत अस्तित्वात असलेले सर्व सरंजामी विशेषाधिकार (Privilege) रद्द करण्यात आले. अपवाद केला होता फक्त बालकासंबंधी विशेषाधिकारांचा. ज्या देशात बालकांचे विशेषाधिकार जपले जातात त्या देशांच्या भावी पिढ्या सतत व्यक्तिविकासाची नवी शिखरे पादाक्रांत करतात. ते देश ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील नवे कीर्तिमान स्थापन करत असतात. आपल्या देशात असं विलोभनीय दृश्य अपवादानंच अनुभावयला मिळतं, याचं कारण आपण बालक हक्कासंदर्भात फारसं गांभीयाने न विचार करतो, न कृती. जगातील बालमजुरांची संख्या भारतात सर्वाधिक असणे ही त्याचीच फलश्रुती होय. समाजपरिवर्तन हे कायद्याने नाही तर जनमत परिवर्तनाने, समाजप्रबोधनाने अधिक प्रभावी होऊ शकते, असा विश्वास जगभर वाढतो आहे. 'बालमजुरी विरोधी विश्वयात्रा' योजिली गेली. त्यामागेही हाच विश्वास आहे.
 ज्या कोवळ्या हातांनी साक्षरतेचे धडे गिरवायचे त्यांना आपण खडे वेचायला लावतो ही नामुष्कीची गोष्ट नव्हे का? दारिद्र्याची शिकार म्हणून ज्यांना बालमजुरी मुक्त करणे हे ‘बालमजुरीविरोधी विश्वयात्रेचे प्रमुख ध्येय आहे. जगातील सात हजार स्वयंसेवी संस्थांनी योजलेली ही विश्वयात्रा म्हणजे बालमजुरी प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेला नियोजनबद्ध कृती कार्यक्रम मानण्यात आला असून जगभरच्या माध्यमांनीच नव्हे, तर राजकीय नि सामाजिक निरीक्षक, संशोधकांनी याची गंभीर नोंद घेतल्याचे दिसून येते.

 अमेरिका,आफ्रिका व आशिया खंडातील देशात बालमजुरांची संख्या अधिक असल्याने या त्रिखंडात जागरणाचे लक्ष केंद्रित केले गेले आहे. विश्वयात्रा त्रिखंडात

१७२...बालमजुरी आणि समाज जागृती