पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कठोर शिस्तीच्या स्वरूपात समोर येत असल्यामुळे तिचे आवश्यक ते यश हाती येत नाही. या शिस्तीची जागा अनौपचारिकतेने घेतली व व्यक्तिगत लक्ष केंद्रित केले गेले तर संस्कारक्षम बालक घडविणे व त्याचा सर्वांगीण विकास करणे या गोष्टी घरापेक्षाही अधिक सक्षमतेने बालकल्याणकारी संस्था करू शकतील, असे वाटते. संस्कारासंबंधात सामूहिक जीवन जगण्याची फार मोठी संधी संस्थात्मक जडणघडणीत बालकास मिळत असते. शिवाय संस्थांमध्ये वाढणारी मुले ही अधिक स्वावलंबी, संकटावर मात करण्याची ऊर्मी बाळगणारी व आत्मविश्वासी असतात. संस्कारांच्या संदर्भात व्यक्तिगत लक्ष दिल्यास घरापेक्षा येथील आत्मिक समृद्धी ही वरच्या पातळीवरची खचितच राहणार आहे.भावनिक संपन्नतेच्या संदर्भात तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण होय. बालकल्याणकारी संस्थांत तेथील कर्मठता व शिस्तप्रियतेमुळे मुले दैनंदिन परिपाठाचा भाग म्हणून शाळेस नियमित जाणे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे या गोष्टी करत असतात. पण या गोष्टीत बालकांची स्वेच्छा, सहयोग अभावानेच दिसून येतो. या संस्थांत मुलांचा कल पाहून त्यांना शिक्षण, व्यवसाय, छंद, कला इ. संदर्भात वाहवा देता आल्यास अधिक बरे होईल. शिवाय बालकल्याणकारी संस्थांतून नियमांच्या चाकोरीबाहेर न जाण्याची तेथील यंत्रणेची जी वृत्ती असते तिच्यामुळे बालकांची योग्यता असूनही त्यांना उच्च शिक्षण, प्रशिक्षण इ. सुविधा अभावानेच दिल्या जातात. परिणामी कुशाग्र बुद्धीच्या मुलासही सुमार दर्जाचे शिक्षण देण्याचा करंटेपणा या संस्था नियमितपणे करत आल्या आहेत. या संदर्भात मुलांचा व्यक्तिगत वकूब व विकास पाहून त्यांना त्यांच्या आवडीनुरूप शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, या दृष्टिकोनातून जर बालकल्याणकारी संस्थांनी आपली कार्यपद्धती बदलली तर बालकांचे संगोपन, शिक्षण व सुसंस्कार व्यवस्थित होतील व या संस्था भौतिकतेबरोबरच भावनिक दृष्टीने समृद्ध होतील. बालकांच्या गरजांचे प्राधान्यक्रम निश्चित करून त्या अन्वये कार्य झाले तर बालकांना त्यांचे स्वराज्य बहाल करता येईल. यामुळे बालकांच्या हक्कांचे रक्षण होऊन त्यांच्या सहजविकासाचा वाव मिळेल. संवेदनक्षम प्रशासन हे अशा संस्थांचे प्रमुख ब्रीद व्हायला हवे.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१५७