पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे म्हणजे संस्था चालवणे यात बरेचजण कृतार्थता मानतात. पण बालकल्याणकारी संस्थांत अशा भौतिक सुविधांचा क्रम भावनिक संपन्नतेनंतरचा असतो याचा त्यांना चक्क विसर पडल्याचे जाणवते. अनाथ, निराधार, बालगुन्हेगार व सर्वार्थाने वंचित व उपेक्षित असलेल्या बालकांची खरी गरज प्रेम, वात्सल्य, मान्यता, प्रोत्साहन, वर्तन-परिवर्तन, संस्कार, छंद जोपासना इ. गोष्टी असतात हे लक्षातच घेतले जात नाही. या कार्यासाठी डोळस व संवेदनशील कर्मचा-यांचा संच आवश्यक असतो. त्याची जुळवाजुळव नि निवड करीत असताना संस्थेस आवश्यक असणा-या गुण व कर्तव्य निष्ठेच्या मोजपट्या अभावानेच लावलेल्या आढळतात. अशा सर्वंकष जागरूकतेने बालक हे केंद्र मानून त्याच्या शारीरिक, मानसिक, नैतिक समृद्धीचा व्यक्तिपातळीवर विचार होणे याला मी आत्मिक समृद्धी मानतो.

 बालकल्याणकारी संस्थांत आत्मिक समृद्धीचा विचार करत असताना प्रकर्षाने बालकाच्या संगोपनाचा विचार हा अधिक जागरूकतेने करायला हवा. साधारणपणे ० ते ५ या वयोगटातील अनाथ, निराधार, उपेक्षित बालकांचे संगोपन हे एक आव्हान असते. अनैतिक संबंधातून जन्मास आलेली अनौरस बालके, आईवडिलांच्या अकाली व अपघाती निधनाने पोरकी झालेली मुले, अनिच्छेने जन्माला आलेली विकलांग बालके, कुपोषणामुळे रोडावलेली मुले या सर्वांचे संस्थात्मक पद्धतीने संगोपन होत असताना सामूहिक प्रशासन व्यवस्था खरे तर कुचकामीच असते. नवजात अर्भकास मातेपासून दूर करणे म्हणजे साक्षात मृत्यूस निमंत्रणच. अशा स्थितीत या बालकास आईची ऊब देणारी गृहमाता आवश्यक असते. ती न मिळाल्यास तुम्ही अर्भकालयात एन्क्यूबिटर, हीटर, गिझर, फ्रीज, खेळणी, उबदार कपडे, वैद्यकीय साधने, सर्व काही दिले तरी व्यर्थ असते. अशा बालकांना या वयात खरी गरज असते ती मायेच्या उबेची. ती देणे हे बालकल्याणकारी संस्थांचे सर्वप्रथम उद्दिष्ट असायला हवे. पंढरपूर येथील नवरंग बालकाश्रमात नवजात अनाथ मुले कुमारी माता व परित्यक्ता महिलांकडे देऊन मुलांना आई व बाईला मूल असण्यातील भावनिक संपन्नता जोपासली. भावनिक संपन्नतेच्या संदर्भात संगोपनाइतकेच महत्त्व सुसंस्कारास असते. संस्काराच्या बाबतीत घरापेक्षा बालकल्याणकारी संस्था नेहमीच दक्ष असतात. पण ही दक्षता

१५६...उपेक्षितांच्या संस्थांत भावनिक समृद्धी आवश्यक