पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बालकल्याण संस्था व समाज दृष्टी


 बालसुधारगृह, अभिक्षणगृह अनिकेत निकेतन, अनाथाश्रम- सारख्या कितीतरी संस्था आपल्या समाजात अनाथ, उपेक्षित बालगुन्हेगार भिक्षेकरी मुला-मुलींच्या संगोपन, सुसंस्कार, शिक्षण, पुनर्वसनाचे कार्य करत असतात. या संस्थांकडे समाज आजवर उपेक्षेनेच पाहात आला आहे, हे मात्र कटू सत्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात अशा संस्था कार्य करीत आहेत. त्या काळात शासन अनुदानाची व्यवस्था नसल्याने या संस्थांची भिस्त ही लोकाश्रयावर व लोकवर्गणीवर असायची. समाजात दातृत्व, ममत्व या भावना खोलवर रुजलेल्या होत्या. त्यामुळे दयाभाव, सहानुभूती इत्यादीच्या बळावर या संस्था अनेक आघात सहन करून टिकल्या व विकसित झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात कल्याणकारी व लोकानुवर्ती शासन झाल्यावर अशा संस्थांची जबाबदारी शासनाने स्वीकारून त्यांना योजनानिहाय अनुदान दिले. या संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्या तरी स्थिर होण्यास या अनुदानाचे साहाय्य झाले. बदलत्या परिस्थितीत अशा संस्थांकडे पाहण्याची लोकदृष्टी बदलायला हवी होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

 आज ही लोकदृष्टी व लोकमतानुसार प्रासंगिक दया दाखविण्याचेच ठिकाण म्हणून या संस्थांकडे पाहिले जाते. रक्षाबंधनादिवशी समस्त महिला मंडळे, महिलांचे क्लब अशा संस्थाकडे धाव घेतात. राख्या बांधून मिठाई वाटून वृत्तपत्रांत व विसरता फोटो छापतात. दिवाळी, स्वातंत्र्यदिन इत्यादी वेळी सर्व बालकनवाळू संस्था या मुलांना मिठाई वाटतात. गावात महाप्रसाद झाला किंवा लग्न, मुंजी इत्यादी कार्ये उरकल्यानंतर उरलेले पदार्थ मोठ्या उदारपणे या संस्थांकडे पाठविले जातात. या सर्वांमागे या संस्थांवर दया दाखवण्याचा भाव असतो. अजूनही जनमानसात एक अशी भावना दृढ आहे की, येथील मुलांना भरपूर सकस अन्न मिळत नाही. त्यांच्याकडे कोणी पाहात नाही. आपण दिले तरच त्यांना गोडधोड

१५२...बालकल्याण संस्था व समाज दृष्टी