पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या वृद्धेपर्यंतच्या ३००-३५० मुले, मुली, महिलांचं कुटुंब. एक निपुत्रिक जोडपं होतं. ते सारी संस्था पहायचं. जव्हेरे नाव. बाबा जव्हेरे नि ताई जव्हेरे, शिपाई, क्लार्क, भंगी, लाकूडतोडा, माळी असा पुरुष स्टाफ. पण ते नोकर नव्हते. संस्थेतच राहायचे. आई-बाबाशिवाय नाना, काका, आप्पा, मामा अशीच नावे त्यांची. मोळं झाल्यावर त्यांची खरी नावं कळली. हे सारे परत एकाच कुटुंबातले. त्यांच्या पिढ्या काम करायच्या. संस्थेत शाळा, दवाखाना, स्वयंपाकघर, शिवणक्लास, ग्रंथालय, खेळघर, कोठी, बालमंदिर सारं होतं. कुमारीमाता यायच्या. सहा-सात महिने राहायच्या. बाळाला जन्म देऊन बाळ ठेवून निघून जायच्या. माझ्या समजेच्या गेल्या पन्नास वर्षांच्या प्रवासात हजारो कुमारीमाता आल्या-गेल्या व समाजात पुन्हा संभावित, गत्र्या होऊन सुखाचं जीवन जगू लागल्या. त्यांची मुलं...मुली रामभरोसे जगायची.
 कुमारी आई मुलाला जन्म देऊन लगेच महिन्या-दोन महिन्यात काढता पाय घ्यायची.... तिचे आई-वडील समाजभयानं तिला मोकळे करण्यापुरते ठेवायचे.... दूधपितं बाळ आईच्या अचानक भूमिगत होण्यानं "Mother Sick' व्हायचं. आश्रमानं मोठी विलक्षण रचना केलेली होती. आश्रमाच्या शेजारीच कैकाडी गल्ली होती... तिथं बाळंत झालेल्या बायका (Wet Mothers) असायच्या. त्यांना आश्रमात मुलांना पाजायसाठी आणायच्या.... मोबदला द्यायचा. शिवाय संस्थेत बाळंत झालेल्या कुमारी मातांना ज्यांना दूध जास्त असायचं...सिस्टर, नर्सेस त्यांचा पान्हा जिरवण्या, रिचवण्यासाठी पाजायला अन्य मुलं...मुली द्यायच्या. ती बापडी आश्रमाच्या ऋणातून अशी उतराई व्हायची.

 आश्रमात पाय घसरलेल्या, सोडलेल्या, चारित्र्यसंशयावरून टाकलेल्या परित्यक्त्या असायच्या. त्यांना घर, नातेवाईक कायमचेच तुटलेले असायचे. त्यांना घर पारखं झालेलं असायचं. आता आश्रम हेच त्यांचं घर व्हायचं.... आयुष्य त्यांना इथंच काढायचं असायचं. अशांना आश्रम स्वयंपाक, नर्सिंग, मुलांचा सांभाळ, स्वच्छता, शिकवणं, शिवणकाम, शुश्रूषा, संगीत, कार्यालयीन अशी कामं द्यायचा. ती देताना त्यांची आवड, शिक्षण, कल पाहिला जायचा. त्या कामाचा मोबदला (पगार) दिला जायचा. शिवाय त्यांच्या मनाची पोकळी भरून निघावी म्हणून त्यांना मुलं-मुली सांभाळायला द्यायचा. सगळ्यांना नाही

१५०...कुटुंब नसलेल्यांची कुटुंब