पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विडा उचललेली ही कुटुंबे. यांच्याकडून समाजातील परंपरागत कुटुंबांना बरंच शिकता येण्यासारखं आहे. वर्तमान कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इ. बद्दल पुनर्विचार, फेरमांडणी करायची झाल्यास संस्थात्मक, एकात्मिक, वंचित कुटुंबांना समजून घेतल्याशिवाय समाजपरीघ आपणास रुंदावता येणार नाही. संघर्षापेक्षा हे कुटुंब समझोता, समन्वय महत्त्वाचा मानते. कुणी आपल्या वाटेत काटे पसरले तर त्या जागी फुले पसरण्याचा उदारमतवाद ही या कुटुंबाची शिकवण होय. मनुवादाला भेद देत विशुद्ध मानवतावाद जोपासणारी ही कुटुंबं नवसमाज निर्माण करणारी ऊर्जा केंद्रे होत. स्त्री-पुरुष भेद मिटवून माणसुकीची साद घालणारी ही कुटुंब अधिक नैतिक, पारदर्शी होत. ज्यांना कुणाला आपलं कुटुंब नव्या शतकाचं, नव्या विचाराचं, नव्या आदर्शाचं बनवायचं असेल व कुटुंब संकल्पनेची नवी मांडणी करायची असेल, त्या सर्वांना संस्थात्मक, एकात्मिक वंचितांची कुटुंब अनुकरणीय ठरतील, असा अनुभवांती माझा विश्वास आहे.
 वरील सारं विवेचन तुम्हाला वैचारिक, काल्पनिक, आदर्शासाठी केलेली रचना वाटेल म्हणून मी आमच्या संस्थेचंच उदाहरण देतो. आमच्या संस्थेचं हे उदाहरण अपवाद असलं तरी अनुकरणीय वाटतं. मी पुढे मोठा झाल्यावर महाराष्ट्रातल्या अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम, बालगृह चालविणा-या संस्थांचा अध्यक्ष होतो. त्या काळात मी महाराष्ट्रातील अशा एकूण एक संस्था जवळून पाहिल्या आहेत. थोड्या फार फरकाने कुटुंबभाव, मानलेली नाती, आप्तसंबंध तेथील लाभार्थीच्या जीवनात संस्थाकाळात तयार होतात व पुढे औपचारिक, अनौपचारिकपणे आयुष्यभर चालत राहतात.

 माझा जन्म पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात सन १९५० ला झाला. ती संस्था मुंबई प्रार्थना समाजातर्फे चालविली जायची. चालविण्यामागे फार मोठा मानवी दृष्टिकोन होता. समाजाने नाकारलेल्यांना स्वीकारायचं नि त्यांना 'माणूस' म्हणून परत समाजात सुस्थापित करायचं. संस्थेत असा कुठेच फलक नव्हता... ही संस्था मातेचं कार्य करते'... पण प्रत्यक्षात ते व्हायचं. त्या संस्थेत कोण नव्हतं? कुमारी माता, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, शिक्षा झालेल्या कैदी भगिनी, त्यांची मुलं, अपंग, मतिमंद, वेडे, अनाथ, निराधार, चुकलेली, सोडलेली, पळून आलेली मुलं, मुली, वृद्धा, कोण नव्हतं असं नाही.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१४९