पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नवसमाज निर्माण करणारे कुटुंब

 माझ्या अनुभवाच्या आधारे अशी धारणा झाली आहे की संस्थांचं एकात्मिक कुटुंब हे जागतिकीकरणाने निर्माण होणा-या नव्या संस्कृती व समाजाचं ‘रोल मॉडेल' होय. ही एकविसाव्या शतकातील नव्या कुटुंबरचनेचा वस्तुपाठ म्हणूनही या कुटुंबांकडे पाहता येईल. जात, धर्म, वंशांची कोळिष्टके नसलेली ही कुटुंबं. नव्या मानव अधिकार संकल्पनेस अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याची क्षमता समाज कुटुंबापेक्षा संस्थाकुटुंबात अधिक दिसून येते. ही कुटुंबे एकच जात मानतात, ती म्हणजे ‘मनुष्य.' यांचा एकच धर्म असतो, ‘मानवधर्म'.' नातं एकच असतं, 'माणुसकी.' त्या दृष्टीनं हे कुटुंब पुरोगामीच म्हणावं लागेल. या कुटुंबाच्या तुलनेत समाजातील कुटुंब पारंपरिक ठरतात खरी! विज्ञाननिष्ठा, समता, बंधुता ही या कुटुंबाची जीवनमूल्यं असतात. संधी देण्यावर, सुधारण्यावर, प्रयोगावर या कुटुंबाचा भर असल्याने इथे 'सक्सेस स्टोरीज'चा कधी दुष्काळ असत नही. ‘पॉझिटिव्ह रिझल्टस्’ अधिक. येशू ख्रिस्ताचा उदार दृष्टिकोन हे या कुटुंबाचं तत्त्वज्ञान होऊन जातं. ते या कुटुंबाच्या कार्यपद्धतीमुळे. 'लेकरू अज्ञानी होतं, त्याला क्षमा करा' म्हणणारं हे कुटुंब सकारात्मक असतं. निषेधाला नकार व विधीला होकार ही इथली ‘बाय डिफॉल्ट सिस्टिम' असते. बुद्धाची चरम क्षमा शोधायची तर तुम्हाला याच कुटुंबाचं शरणागत व्हावं लागेल. करुणा व क्रौर्य यांचं अद्वैत या कुटुंबात आढळतं. क्रौर्य समाज करतं. संस्था करुणा देते! पाप समाज करतो. पुण्य संस्थेच्या पदरी उपजत असतं. पापी माणसांची, तुटलेली बेटं म्हणून निर्माण केलेल्या या संस्था...पण त्या कोणी निर्माण केल्या याचाही विचार नव्या समाजरचनेच्या संदर्भाने व्हायला हवा. संस्थेत राहणारे बळी... त्याचा काय दोष हेही एकदा संवेदनशीलतेनं समजून घ्यायला हवं. देव, दैव, कर्मफल, पाप-पुण्य, उच्चनीचता, सवर्ण-अवर्ण, स्त्री-पुरुष अशांना थारा नसलेली ही कुटुंबं अनुकरणीय नव्हेत का? इथं स्वार्थ नसतो. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' अशा निष्काम वृत्तीनं कर्तव्य पार पाडणारं ही कुटुंबं! कबीर, कर्ण यांचे आदर्श. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रभृतींनी त्याग, सेवा, समर्पण, ध्येय इ.तून या कुटुंबांचा पाया रचला. समाजातून सर्व प्रकारची वंचितता हद्दपार करण्याचा

१४८...कुटुंब नसलेल्यांची कुटुंब