पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुमचं काळीज बनवत असता. त्या सुखाची सर जगातल्या कोणत्याच सुखास येणार नाही. मूल दत्तक देणे म्हणजे विचारपूर्वक स्वीकारलेले पालकत्व असते. ते जन्मदात्या पालकत्वापेक्षा अधिक सुजाण आणि जागृत असते असा जगभराचा अनुभव आहे. दत्तक पालक हे नेहमीच नव्या वाटेने जाणारे वाटसरू असतात. ते एक अशी नवी वाट मळत आहेत...नव्या जगाकडे जाणारी... जिथे जात, धर्म, नाती-गोती यांच्या पलीकडचं जग असतं... मानवतेस साद घालणारं! जीवनाप्रमाणे दत्तक हा देखील संबंधितांनी स्वेच्छेने एकमेकांशी केलेला अनौपचारिक करार असतो. स्नेहसंबंध वृद्धिंगत करणारा. मूल दत्तक घेत असताना सर्वसामान्य जन्म देणाच्या पालकांप्रमाणे तुम्ही केवळ एका जातीची, शरीराची पुननिर्मिती नाही करत. तुम्ही करत असता तुमच्या मनाची पुनर्बाधणी, जीवनाची पुनर्रचना- एका नव्या आनंदवनाची. अशा ब-याच गोष्टी दत्तकाबद्दल सांगता येतील.

 मी एक छोटा अनुभव सांगणार आहे. तो तुम्हास बरंच सांगून जाईल, असे वाटते. आमच्या एका संस्थेत एक बाळ आलं होतं. जन्मजात आंधळं होतं ते. त्याला दृष्टी येण्याची शक्यता नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ते बाळ एका जोडप्याने स्वीकारायचं ठरवलं. दत्तकीकरणाचे सारे सोपस्कार झाल्यावर कायम दत्तकाचा प्रस्ताव न्यायाधीशांपुढे होता. अहवालात हे वाचून न्यायाधीश महोदय चक्रावले की मूल अंध आहे. शिवाय त्याला दृष्टी येण्याची शक्यताही नाही. असे मूल हे दांपत्य का म्हणून दत्तक घ्यायला निघाले असेल! जरूर काही तरी अन्य हेतू असणार! त्यांनी निकाल राखून ठेवला व पालकांचे म्हणणे ऐकून मग मान्यता देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगून टाकले. पालक न्यायाधीशांपुढे हजर झाले. त्यांनी प्रश्न केला, अशा मुलास का म्हणून दत्तक घेता?' पालकांचे उत्तर ऐकून न्यायाधीश दिग्मूढ झाले. पालक म्हणाले, 'या मुलास आमची अधिक गरज आहे.' दत्तक घेताना जोवर आपण ही दृष्टी स्वीकारणार नाही तोवर या जगातील उदारता, मानवता समृद्ध होणार नाही. या जगातील कृपणता, अनैतिकता, अनाथपण संपवायचं तर आपल्या पलीकडे जाऊन बघायला आपण शिकले पाहिजे.

१४२...बाळ दत्तक घेताना....