पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दत्तक दिले जाणारे मूल या घरात रुळेल का? एकदा याची खात्री झाली की, मग काही कागदपत्रे तुम्हास सादर करावी लागतात. त्यात प्रामुख्याने तुमचे उत्पन्न, आरोग्य, वय इत्यादी पाहिले जाते. मग बालकल्याण अधिकारी बालकल्याण मंडळाकडे तुम्हास मूल दत्तक देण्याची शिफारस करतात. सुरुवातीस दत्तक मूल अथवा मुलगी, तात्पुरते सांभाळायला म्हणून दिली जाते. नंतर कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण केली जाते.
 मूल दत्तक घेताना घरातील सर्व संबंधितांची मानसिक तयारी, दृढ निर्णय महत्त्वाचा असतो. त्याबरोबर घरात येणा-या बाळाच्या सांभाळाची माहिती असणे ही आवश्यक असते. विशेषतः निपुत्रिक दाम्पत्यांना मुलांच्या संगोपनाची सवय असतेच असे नाही. यासाठी आता बाजारात अनेक पुस्तके आली आहेत. ती भरपूर मार्गदर्शन तर करतातच शिवाय मनोबलही वाढवितात, यानंतर बाळ घरात येण्यापूर्वीच तुम्ही त्यास लळा लावू शकता. संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, काळजीवाहक मातांच्या मार्गदर्शनाखाली मुलास पाहून घेऊ शकता. मूल घरी आणले तरी या संस्था तुम्हास हवी ती सारी मदत करतात. तुम्हास मूल सांभाळणे सोपे व्हावे म्हणून पालकांना आता सांभाळ रजाही मिळू शकते.
 मूल दत्तक घेताना सर्व निर्णय तुमच्या संमतीने व सल्ल्यानेच घेतले जातात. तुमच्या पसंतीनेच मूल तुम्हास मिळू शकते. त्यांच्या सर्व आरोग्य तपासण्याचाचण्या पूर्ण केल्या जातात. मुलांचा बुद्ध्यांकही तुम्हाला पाहता येतो. तुम्ही तुमच्या विश्वासातल्या डॉक्टरास दाखवून मुलाच्या निरोगीपणाची खात्री करून घेऊ शकता. असं घरात येणारं मूल एका अर्थाने सोयीचं असतं. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं. हवं तसं, हवं तेवढं मूल घेतल्याने या मुलाचं आगमन हृदयरोपणच ठरवं. अशा मुलांच्या घरात येण्यानं घरात उसळणारी चैतन्याची कारंजी ज्यांनी दुरून जवळून पाहिली-अनुभवली असतील ती सर्व मंडळी तुम्हास सांगतील की स्वर्गसुखाचा आनंद यापेक्षा वेगळा असतंच नाही मुळी.

 मूल दत्तक घेताना तुमच्या सर्व शंकांचे समाधान या संस्था करतात. शिवाय अशी मुलं दत्तक घेतलेल्या कुटुंबांशी तुमची ओळख करून दिली जाते. मूल दत्तक घेतले की जन्म दिलेल्या मुलाशी जे नि जसे संबंध असतात तसेच ते मुलात नि तुमच्यात निर्माण होतात. तुमच्या मुलाचा तुम्हास जन्मदाखला मिळतो.

१४०...बाळ दत्तक घेताना....