पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संरक्षण, सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता दत्तकास समाजमान्यताही लाभली आहे.
 एक काळ असा होता की, अपत्यहीन नसलेली जोडपीच मूल दत्तक घ्यायची. आता समाज अधिक उदार आणि जागृत झाला आहे. अपत्यहीन दाम्पत्ये तर मुलं दत्तक घेतातच शिवाय स्वतः जन्म दिलेला एखादा मुलगा-मुलगी असेल तर त्याला बहीण किंवा भाऊ हवी म्हणून अनेकजण संस्थांतील मुले दत्तक घेतात. आणखी विशेष म्हणजे अशा कुटुंबांनी अपंग, मतिमंद, अंध मुलेही दत्तक घेतली आहेत. समाजातील सर्वांनीच यांचे अनुकरण करायला हवे!
 मूल दत्तक घेणे-देणे ही फार जुनी पद्धत आहे. वेदांमध्येही याचे उल्लेख सापडतात. आपल्या पुराण, महाभारतादी प्राचीन साहित्यात दत्तकाच्या किती कथा आहेत. कृष्णास देवकीने जन्म दिला खरा, पण सांभाळ मात्र यशोदेने केला. असे कितीतरी यशोदा आणि नंद आजही आपल्या गोकुळात सर्वत्र आहेत. अपत्य न झाल्याने नातेसंबंधातील मूल दत्तक घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. पण अलीकडच्या काळात आपले सारे संबंध हे व्यक्तिगत स्वार्थास केंद्र मानून विकसित होत राहिल्याने नातेसंबंधातील मूल दत्तक न घेता अनाथ मुले दत्तक घेण्याची प्रवृत्ती वाढते आहे. हे प्रगल्भ समाजधारणेचे जसे लक्षण होय तसेच ते समाज उदार झाल्याचीही प्रचिती होय.

 एखाद्यास अपत्य नसल्याने अथवा इतर कोणत्याही कारणाने मूल दत्तक घ्यायचे असेल तर त्यासंबंधी महत्त्वाचा प्राथमिक भाग म्हणजे दृढ निर्णय करणे होय. दाम्पत्य असेल तर या बाबतीत पती-पत्नीत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. घरातील अथवा नात्यातील इतरांची मान्यता, संमती असेल तर उत्तमच. कुमारी प्रौढेस अथवा अविवाहित प्रौढांसही मुले दत्तक घेता येतात. यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही जवळच्या अनाथाश्रम, दत्तक संस्थांशी संपर्क साधायचा. एक छोटासा अर्ज करायचा. आपली सगळी माहिती द्यायची. मुलगा, मुलगी त्यांचं वय इ.बद्दल आपल्या अपेक्षा सांगायच्या. तुमची दत्तक घ्यायची इच्छा असल्याचे कळलं की, त्या संस्थेचे बालकल्याण अधिकारी किंवा समाज कार्यकर्ती तुमच्या घरी येते. घराची पाहणी, अभ्यास केला जातो. हे पाहिले जाते की, दत्तक मुलास सांभाळण्यास योग्य असे वातावरण, परस्पर संबंध आहेत का?

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१३९