पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षातील सर्वांत भीषण घटना म्हणजे बालिकांविषयी समाजात निर्माण झालेले ‘अपत्यभय.' पूर्वी संस्थांत (अर्भकालय, बालसदन) अनैतिक संबंधातून जन्माला आलेली अनाथ, अनौरस अर्भके यायची. आता अशा अर्भकांमध्ये केवळ स्त्रीजीव (मुलगी) जन्माला आली म्हणून टाकून देण्याचे प्रमाण वाढते आहे. याची समाजाने गंभीरपणे नोंद घेणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाले आहे.
 संस्थाश्रयी निराधार बालिकांचे प्रश्न
 आज महाराष्ट्रात ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, दारिद्र्य रेषेखालील बालिका, अल्पवयीन प्रेमिका, बलात्कारित बालिका, अल्पवयीन देवदासी, वेश्या, कुमारी माता, हुंडाबळी, बालविवाहिता, अपंगमती बालिका, अपंग, मूक-बधिर अशा अनेक प्रकारे निराधार, उपेक्षित व असहाय्य झालेल्या बालिका अर्भकालय, बालसदन, बालगृह, कन्या अभिक्षण गृह, अनाथाश्रम, महिलाश्रम, स्वीकारगृह, आधारगृह, निवारागृह, देवदासी पुनर्वसन केंद्र, माहेर, अनुरक्षण गृहसारख्या स्वयंसेवी व शासकीय संस्थांत प्रवेशित असतात. यांचे संगोपन, संरक्षण, आहार, आरोग्य, मानिसक, भावनिक विकास, शिक्षण, सुसंस्कार, व्यवसाय, प्रशिक्षण, सेवायोजन, विवाह, नोकरी, स्वावलंबन, पुनर्वसन असे अनेकविध प्रश्न आहेत.
 संगोपन
 अनाथ, अनौरस, पोरक्या, टाकून-सोडून दिलेल्या चुकलेल्या, हरवलेल्या बालिका अर्भकालय, अनाथालय, बालसदनसारख्या संस्थांमध्ये संगोपनार्थ येतात. त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देण्याचा भाग म्हणून नावे ठेवणे आवश्यकच नाही तर अनिवार्य असते. ब-याच संस्थांमध्ये मुलीची फक्त विशेष नावे (व्यक्तिगत) ठेवली जातात. वडिलांचे नाव, आडनाव, जात, धर्म निश्चित केले जात नाहीत. समाजाची व देशाच्या कार्यपद्धतीची एकूण रचना लक्षात घेता व बालक हक्कांचा विचार करता या सर्व गोष्टी मिळणे तीस आवश्यक असूनही या बाबतीतील सर्व प्रश्न स्वातंत्र्यास ४३ वर्षे उलटून गेली तरी अनुत्तरीत आहेत याचा खेद करावा तितका थोडा आहे.

 अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बालिकांचे प्रश्न गंभीर आहेत. अशा मुलींचा जन्म बहुधा प्रेम-प्रणयाच्या पहिल्या उभारीत अजाणतेपणी कुमारी मातेच्या

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१३१