पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढत्या गरजा नि संख्येने सिद्ध झाले. अनाथाश्रम, बालिकाश्रम, महिलाश्रम या संस्थांत बाल विवाहिता, बाल विधवा, कुमारी माता येऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकात घरी-दारी उपेक्षित नि अन्यायाचे जीवन कंठणाच्या बालिकांना या संस्थांमुळे घरच्या, समाजाच्या, नातेवाईक, आप्तेष्टांच्या छळापासून मुक्त होता आले. तरी या संस्था त्या काळात या उपेक्षित बालिकांची मुक्तांगणे बनू शकल्या नाहीत, हे मान्य करायला हवे. या सर्व संस्था त्या काळात बालिकांच्या कल्याणार्थ समर्पित असल्या तरी त्यांचे एकंदर स्वरूप व कार्यपद्धती कुमारी माता, बालविधवा, बालविवाहितांचा समाजास विटाळ होऊ नये म्हणून घेतलेल्या खबरदारीच्या रूपाची होती. समाजाच्या दया व दातृत्वावर या संस्थांचा उदरनिर्वाह होत असल्याने समाजाची गरज म्हणून या बालिकांना सामाजिक संसर्गापासून अलिप्त ठेवले जायचे. बाळंतिणीस अंधाच्या खोलीत ठेवण्यासारखीच अमानुषता या बालिकांच्या संदर्भात असायची. त्यामुळे त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाचे जाणीवपूर्वक व प्रागतिक प्रयत्न अपवादाने होत राहायचे. विधवा विवाह, पुनर्विवाह हाच त्यांच्या पुनर्वसनाचा रामबाण उपाय होता. ज्या निराधार बालकांचे विवाह व्हायचे नाही अशा बालिका मातृत्व सुखास पारख्या राहायच्या. शापित अहिल्येप्रमाणे रामस्पर्शाच्या प्रतिक्षेत कितीतरी बालिकांची जीवने उजळण्यापूर्वीच विझून-विरून गेली. अशा बालिकांच्या जीवनास नवे परिमाण दिले ते महात्मा फुले नि महर्षी धों. के. कर्वे यांनी. शिक्षणाने बालिकांचे व्यक्तिमत्त्व संस्थांमध्ये विकसित करून स्वावलंबी बनविल्याने त्यांची नावे बालिकांच्या संगोपन व पुनर्वसन इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी लागतील.

 स्वातंत्र्योत्तर काळात समाजाची जडण-घडण बदलली. कल्याणकारी सरकार कार्यरत झाले. शिक्षणाचा प्रसार झाला. समाज परंपरा, धर्म, चालिरीती, रूढी, अंधश्रद्धांतून मुक्त झाला. स्त्रीस समानतेची वागणूक मिळू लागली. या मोकळिकीतून बालिकांच्या नव्या प्रश्नांची निर्मिती झाली. संस्थांमध्ये पूर्वी अनाथ, निराधार, कुमारी माता, बाल विवाहिता, विधवा, परित्यक्ता यायच्या. आता अशा संस्थांमध्ये याशिवाय प्रेमविवाह करणाच्या बाल विवाहिता, बलात्कारित बालिका, फूस लावून पळवून नेलेल्या मुली, प्रियकराबरोबर पळून गेलेल्या, फसलेल्या, देवदासी, अल्पवयीन वेश्या, हुंडाबळी अशा बालिका संस्थेत येत आहेत. सार्क बालिका

१३०...संस्थाश्रयी मुली व महिलांचे प्रश्न