पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाचे असले तरी सर्व समस्यांच्या संगमाचे तीर्थस्थळ, ‘बाल कल्याणाची पंढरी' म्हणून प्रार्थना समाजाने चालविलेल्या या संस्थेकडेच पहावे लागेल. असे प्रयत्न एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती धर्मप्रचारकांनीही केले, पण धर्मप्रचारकांच्या मर्यादेमुळे त्यांच्या कामाचा असा विकास झाला नाही. पुढे इ. स. १८८९ मध्ये पंडिता रमाबाईंनी 'शारदाश्रम' सुरू करून परित्यक्त व कुमारी मातांचे संगोपन, संरक्षण कार्य सुरू केले. या शतकाच्या अंतिम टप्प्यात इ. १८९६ मध्ये महर्षि धों. के. कर्वे यांनी हिंगणे येथे बालिकाश्रम स्थापून महात्मा फुलेंचे अपूर्ण कार्य पूर्ण केले.
 विसावे शतक अनाथ, निराधार बालिकांच्या कल्याणकारी कार्याचे शतक म्हणून ओळखले जाते. या काळात महाराष्ट्रात बालिकांच्या संगोपन शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसन कार्याच्या अनेक संस्थां नि योजना सुरू झाल्या. पहिल्या व दुस-या महायुद्धानंतर वैश्विक स्तरावर अनाथ निराधार बालिकांच्या संगोपन व पुनर्वसनाचे भीषण स्वरूप जगासमोर आले. बालक वर्ष, महिला वर्ष सारख्या उपक्रमांनी या प्रश्नी लोकजागराचे ऐतिहासिक कार्य केले. सार्क बालिका वर्षाने या प्रश्नांविषयी समाजास चिकित्सक बनवले. या सर्वाचा चरमोत्वर्ष म्हणजे १ ऑक्टोबर, १९९० रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जगातील ७२ देशांचा राष्ट्र प्रमुखांनी बालक हक्काच्या संकल्पावर स्वाक्षरी करून या प्रश्नाविषयी आपली असाधारण आस्था व्यक्त केली. आता जगातील बहुसंख्य राष्ट्रात बालक हक्काचे पालन ही जागतिक वैधानिक जबाबदारी बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर संपन्न होणार हे चर्चासत्र संस्थांश्रयी निराधार बालिकांच्या संगोपन व पुनर्वसन विषयक प्रश्नाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देईल अशी आशा आहे.
 संस्थांश्रयी निराधार बालिका

 बालिका कल्याणाच्या आरंभीच्या काळात अनाथाश्रम, बालिकाश्रम सारख्या संस्थां कार्यरत होत्या. या संस्थांमध्ये प्रामुख्याने अनाथ, अनौरस, पोरक्या, निराधार बालिकांचे संगोपन केले जायचे. पण पुढच्या काळात स्त्रियांच्या प्रश्नांविषयी जसजशी जागृती निर्माण होत गेली तसतशी संस्थांत येणा-या बालिकांचे स्वरूपही बदलत गेले. समाजात स्त्रीविषयक जागृती झाल्यानंतर खरे तर अशा संस्थांची समाजात गरजच राहता नये होती पण हे जागर तकलादू होते हे अशा संस्थांच्या

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१२९