पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थेनुसार मुलांचे जात, धर्म ठरतात. नोकरीत व शिक्षणात या मुलांचा सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर पहिला अधिकार असूनही ही मुले अद्याप त्यापासून वंचित आहेत. संस्थांमध्ये मुलांना मिळणारी एकंदर वागणूक ही अमानुष असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक छळ सर्वत्र आढळतो. मोकळा श्वास व मोकळे मन हे या संस्थांमधील मुलांपुढचे खरे प्रश्न होत.
 बालक हक्कांच्या उल्लंघनांची तणावग्रस्तता
 या सर्व स्थितीमुळे संस्थांमधील मुलांचा सांभाळ घरच्याप्रमाणे स्वाभाविक होत नाही. त्यामुळे संस्थांतील मुले तणावग्रस्त चेह-यांची आढळता. त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक वाढ होत नाही. मुले आपण अनाथ, निराधार, संस्थाश्रयी आहोत, या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. त्यांच्यात सामाजिक जीवन व व्यवहार कौशल्यांचा अभाव असतो. ती भितरी, भेदरलेली, आत्मविश्वास नसलेली असतात. भावनिक पोकळी त्यांच्यात मोठी असते. ती हळवी असतात. तर काही परिस्थितीची नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून आक्रमक, उद्धट, निगरगट्ट असतात. हट्टीपणा त्यांचा स्थायीभाव असतो. ती संस्थात्मक चौकटीची प्रतिक्षिप्त क्रिया असते. संकरित मुलात टोकाचे सुप्त गुण असतात, कुशाग्रता असते, अपवाद असाधारण कौशल्ये असतात पण विकासाचा वाव अपुरा असतो.
 मुला-मुलींच्या वाढीत फरक आढळतो. मुले-मुली अकाली प्रौढ होतात. हा परिस्थितीने घेतलेला सूड असतो. क्षुल्लक क्षणिक प्रलोभनाला बळी पडण्याचे प्रमाण मुलींमध्ये सररास आढळते. आपले कोणी नसल्याच्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर साधा दिलासा मिळाला तरी जीवन ओवाळायला त्या तयार असतात. त्याचा गैरफायदा घेतल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.
 शालेय शिक्षणात मतिमंद मुलांचे प्रमाण अधिक असणे, हे तणावग्रस्त व्यवस्थेचे फलित म्हणावे लागेल. संस्थामधील मुलांत व्यावसायिक कौशल्य अधिक असते. औपचारिक शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे त्यांचा कल अधिक असतो.

 ही मुले सामाजिकतेची भुकेली असतात. नाते-संबंधाची त्यांच्यात विलक्षण ओढ असते. खेळ, क्रीडा, रंजन ही त्यांची नर्मस्थळे तशीच बलस्थानेही असतात. श्रमप्रतिष्ठा या मुलांत मोठी असते. अंगमेहनतीच्या कामात ती तरबेज असतात. ते त्यांचं एक प्रकारचं उन्नयन असतं. या मुलांचे भाषा व्यवहार हेलकरी असतात.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...११९