पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हळदीकरांनी मुलांना जे प्रश्न दिले होते, त्यामागे एक पक्की धारणा होती. ती निरीक्षण,अनुभवांतून तयार झाली होती. ती म्हणजे संस्थेतील मुलांचं भावविश्व घराघरांतील, दुभंगलेल्या कुटुंबातील, वेश्या, कुष्ठग्रस्त, देवदासी, एड्सग्रस्त दांपत्यांची अपत्य, बालमजुरी अशी वैविध्यपूर्ण समाजघटक म्हणून पुढे येणारी ही मुलं समाजानं लादलेल्या अत्याचारपूर्ण परिस्थितीशी संघर्ष करत स्वत:चं जीवन साकारू पाहताहेत. त्यांचीही स्वप्नं असतात. कळी कुस्करली तरी ओबडधोबड फुल फुलत असतं ना? शिवाय किती तरी कळ्या किड्या-मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात ना? अशाही स्थितीत ही मुलं-मुली सचिन तेंडुलकर, डॉक्टर, सैनिक, शास्त्रज्ञ बनू इच्छितात हे पहिलं की, त्यांच्या काही घडू पाहण्याच्या धडपडीची प्यास खासच दाद मिळणारी!
 या मुलांपैकी अनेकांना-एकतृतीयांश मुलांना जीवन म्हणजे दु:खाचा डोंगर (असूनही) ते ‘पाणी' वाटतं यात सकारात्मकता आहे. तशी जीवनविषयक अशाश्वतेची सुप्त भीतीही. आपण खोटं बोललो तर त्याचे वाईट परिणाम होतात असं १४३ पैकी ३९ मुलं जेव्हा कबूल करतात तेव्हा लक्षात येतं की, समाज, पालक, खोटं बोलतात. त्यांच्या परिणामांचा भोग म्हणून आपल्या वाट्यास संस्थेचं जिणं आलं याची पक्की जाण खूणगाठ या मुलांत आहे. अधिकांश मुलांना वाचन, अभ्यासापेक्षा खेळ (४७ मुलं) आवडतो, हे मुलांचं उत्तर संस्थांच्या बांधलेपणाची, बंदिस्त व्यवस्थेविषयीची उत्स्फूर्त प्रतिक्रियाच असते. हल्ली संस्थांसारखी घरही बंदिस्त होऊ लागलीत, असं माझं निरीक्षण आहे. नोकरी, परीक्षा, भय,स्पर्धा इत्यादी अनेक कारणांनी मुलांवरील बंधनं वाढत आहेत. ती कला, क्रिडेस वंचित होत आहे, हे चिंतेची बाब होय.

 संस्थांतील मुलांत एकटेपणाची भावना लवकर उदयास येते ती संस्थेतील तुटक व्यवहारांनी. त्यामुळे ईश्वरनिष्ठा त्यांच्यात बळावते. त्यांना गणेशोत्सव असावा वाटतो, कारण संस्थांत चौकटीत तेवढा एकच असर असतो जो त्यांच्या सुप्त गुणांना अवसर देत असतो. मुलांच्या गुणांच्या उदात्तीकरणाचं आव्हान संस्था, पालक यांनी पेलणं आता काळाची गरज बनते आहे. मोठेपणी आपण डॉक्टर व्हावं, असं २३ टक्के मुला-मुलींना वाटणं हे समाजात डॉक्टर बनण्याच्या ‘क्रेझ'चाच परिणाम. १४ टक्के मुलं-मुली शिक्षक होऊ इच्छितात. बालमनावर

११२...भीती आणि भिंतींमधील बंदिस्त बाल्य