पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सापत्नभाव वाचला की तुमच्या लक्षात येईल की ‘ज्यांना काहीच नाही, त्यांना सर्वकाही देण्याचे आपले प्रथम कर्तव्यच आपण विसरतो आहोत. संस्थांमधील अनाथ, निराधार, अनौरस मुलांचे आई, वडील, जात, धर्म, वंश, परंपरा, जन्मतारीख काहीच नसलेली ही मुले; त्यांना स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांच्या गौरवशाली (?) विकासात बाल्य सुरक्षा शाश्वती नाही, संस्थांचा सेवा-सुविधा दर्जा नियंत्रण व्यवस्था नाही, शिक्षणात प्राधान्य, शिष्यवृत्ती नाही, नोकरीत आरक्षण नाही, मतदान अधिकार नाही, आधार कार्ड नाही. ते या देशाचे नागरिक ठरणार तरी कसे? असा साधा प्रश्न स्वातंत्र्य विकासाच्या प्रजासत्ताक प्रवासात आपणाला, राजकर्त्यांना, समाजशास्त्रज्ञ, नियोजकांना पडू नये याला काय म्हणावे? जात व धर्मापलीकडे सामाजिक वास्तवाधारित सामाजिक न्यायाचे तत्त्व जोवर आपण स्वीकारणार नाही तोवर या देशातले हे वंचित शापित, उपेक्षित, दुर्लक्षित नव्हे, समाजाच्या दयेवरच जगत राहणार हा कोणता न्याय? महिला सुरक्षा केंद्रातच भगिनींवर बलात्कार होतात, याला का यंत्रणा म्हणणार? असा संताप यावा असंच हे निराळं जग आहे खरं!
 तुम्ही हे वाचावं. तुमचा समाज संवेदी सूचकांक वाढावा म्हणून वेळोवेळी केलेलं हे लेखन ग्रंथरूप घेऊ शकलं याचा मला आनंद आहे. या देशातील वंचितांचं जिणं सुरक्षित, बाल्य समृद्ध होईल तो सुदिन! सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य ज्या दिवशी संस्थाश्रयी मुले, मुली व महिलांना बहाल होईल तेव्हा हे राष्ट्र ख-या अर्थाने प्रजासत्ताक होईल.
 हे पुस्तक माझे स्नेही व जगन्मित्र रवींद्र जोशी व त्यांचे चिरंजीव अमेय व आलोकने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने खप, व्यवसाय असा विचार न करता प्रकाशित करण्याचे ठरवून वंचितांच्या वेदनांशी जी नाळ व नाते जोडले, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे.

१३ मे, २०१३

अक्षय्य तृतीया

(डॉ. सुनीलकुमार लवटे)