पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे कार्य केलं. काही कारणांनी नंतर सर्व सोडलं. पण या काळात मी महाराष्ट्रातल्या या मुले, मुली, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाज सेवा' त्रैमासिकाचे संपादन केलं. संस्था- बाह्य सेवा सुरू केल्या. योजनांचं एकीकरण केलं. महिला, बाल व अपंग कल्याणाचं स्वतंत्र मंत्रालय, संचालनालय (आज आयुक्तालय) याच काळातलं. भारत सरकार शिष्टमंडळातून व फ्रान्स-भारत मैत्री कार्यक्रमातून युरोप, आशिया, खंडातील सुमारे वीस देशातील अशा संस्थांना भेटी देऊन अभ्यास, संशोधन, लेखन केले. सन १९५० (माझा जन्म) ते आज (वय वर्षे ६३) मी वंचित विश्वाशी अभिन्न आहे.
 ४) संस्था, लाभार्थी व आर्थिक तरतूद
 आज महिला व बालकल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग, सामाजिक सुरक्षा योजना या मार्फत अनाथाश्रम, निरीक्षण गृह, शिशुगृह, भिक्षेकरी गृह, बालसदन, निराश्रित वसतिगृह व शाळा, अंध वसतिगृह व शाळा, अपंग बालगृह, बहुउद्देशीय अपंग संमिश्रगृह, प्रौढ अपंग कार्यशाळा (वर्कशॉप),अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) अपंग पुनर्वसन केंद्र अशा प्रकारच्या संस्था शासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात. शिवाय एड्सबाधित, देवदासी, वेश्या, कुष्ठरोगी व त्यांची अपत्ये यांच्या विविध संस्था आहेत.
 या संस्थांतून एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृध्दापर्यंत गरजू लाभार्थी राहू शकतात.
 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, बालमजूर, अनौरस, टाकून, सोडून दिलेली, चुकलेली, हरवलेली, घरातून पळून आलेली मुले-मुली, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, दुभंगलेली कुटुंबे, नैसर्गिक आपत्तीग्रस्त, परित्यक्त, विधवा, इ. स्त्री-पुरुष व त्यांची मुले, वृद्ध, अपंग, मतिमंद, मूक बधीर, मुलेमुली, प्रौढ अशा साध्या वंचित, उपेक्षितांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन, शिक्षण, प्रशिक्षण कार्य वरील संस्था करत असतात.

 आजमितीस महाराष्ट्रात वरील प्रकारच्या सुमारे १००० संस्था असून सुमारे ५० हजार लाभार्थी यांचा लाभ घेत आहेत. सन २०१३-१४ चा अर्थसंकल्प विधिमंडळात मंजूर करण्यात आला त्यात महिला व बालकल्याण विभागासाठी १२६४.७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पण त्यात संस्थाबाह्य

१०२...महिला व बालकल्याण संस्थांतील लैंगिक शोषण