पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. आहार वैविध्यपूर्ण हवा, सण, समारंभ घरच्याप्रमाणे साजरे व्हावेत. शाकाहार, मांसाहाराचे स्वातंत्र्य हवं. पथ्यपाणी पाहिलं जावं. संस्था साधनसंपन्न असाव्यात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संस्थेतील पालक, कर्मचारी व मुले यात सौहार्दपूर्ण संबंध व व्यवहार हवा.

 मुलांच्या प्रगतीचा आलेख, इतिहास, बदल नोंदण्याची व्यवस्था हवी. आवडीप्रमाणे व हवे तेवढे शिक्षण मुलांना मिळायला हवे. संस्थांतली मुलंपण घरच्यासारखी शिकून मोठी होऊन स्वावलंबी होऊन कर्ती होईपर्यंत आणि नंतरही घर, माहेर म्हणून या संस्थांचा नि त्यांचा संबंध हवा. असं झालं तरच बालकल्याण संस्था 'घर' होतील. कोंडाळे, कोंडवाडे या संस्थेबद्दलच्या प्रचलित व रूढ कल्पना बदलून या संस्था बालकांचे ‘स्वराज्य' बनायला हव्यात.

९८...कोंडाळे, कोंडवाडे नि कोंदण