पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा दिल्या जातात. संस्थेतील कर्मचारी शक्यतो विनापाश हवेत. ते तिथेच राहणारे हवेत. त्यांच्यात मातृत्व, वात्सल्य, संगोपनाची आवड, मुलांबद्दल प्रेम हवं. स्त्री किंवा पुरुष दोन्ही प्रकारचे पालक हवेत. आज संस्थांमध्ये स्त्री किंवा पुरुष कर्मचारी असतात. कर्मचा-यांचे वेतन, सुविधा, निवृत्ती वेतन आदी काळजी घ्यायला हवी. ते निश्चित असतील तरच ते मुलांची निश्चित काळजी घेतील. संस्था घरासारख्या फर्निचर, सामान, साधनांनी संपन्न हव्यात. त्यात वैविध्य हवे. प्रत्येक संस्थेची इमारत, फर्निचर, परिपाठ एक नसावा. त्यांचं शरीर नि आत्मा दोन्ही अलग हवेत. राहणं, अभ्यास, मनोरंजन, भोजन, खेळ, साच्यासाठी स्वतंत्र सुविधा हव्यात. संस्थांमध्ये मुलं येताच त्यांना आपलेपणाने आत्मसात केलं जावं. तिथं मुलाच्या सवयीप्रमाणे त्याला राहता येईल असं वातावरण असावं. त्याच्या जाती, धर्म, भावनांचा आदर व्हावा. संस्थेतील पालक कर्मचारी आज अधीक्षक, शिक्षक, काळजीवाहक, आचारी, शिपाई म्हणून ओळखले जातात. ते आई, बाबा, आजोबा, मावशी, ताई, काका म्हणून ओळखले जावेत. अशा छोट्या बदलातूनच संस्था 'घर' होते. संस्थेचा परिपाठ लवचिक हवा. त्यात स्वातंत्र्य हवं. त्यात स्वावलंबनास प्रोत्साहन हवं. अंगाई, गोष्टी, भूपाळी याबरोबर नीतीपाठ, मनोरंजन, छंद, खेळ यास भरपूर वाव हवा. यानुरूप झोपेच्या वेळा पाहाव्यात. झोपेत लघवी करणारी, घाबरणारी, बडबडणारी, चालणारी, मुलं हेरून त्यांची काळजी घेतली जावी, उपचार केले जावेत. त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदल, दोषांकडे बारकाईने लक्ष हवे. मुलांच्या वैयक्तिक आरोग्याची दक्षता हवी.

 त्यांचे कपडे, बिछाने, पादत्राणे इत्यादी व्यक्तिगत वापरांच्या वस्तूबाबत निवड, संरक्षण, ठेवणे इत्यादींचे त्यांना स्वातंत्र्य हवे, प्रत्येक मुलास त्याचे स्वत:चे व स्वतंत्र (वैविध्यपूर्ण) कपडे, बिछाने, पादत्राणे, दैनंदिन वापराच्या वस्तू द्यायला हव्यात. संस्थेत याचा पूर्ण अभाव असतो. प्रत्येक मुला-मुलीस कपडे, ताट, वाटी, पेला, साबण, रुमाल, टॉवेल, हेअरबँड, पट्टा, मोजे, नॅपकीन, पावडर, रिबन्स, स्वेटर्स, छत्री, रेनकोट, बेडशीटस्, कव्हर्स, दप्तर इ. द्यायला हवं. यातूनच त्यांचे स्वतंत्र अस्तित्व रुजतं. शिवाय वस्तू वापराची जाण व जबाबदारी येते. पण संस्थांत याबाबत अक्षम्य दुर्लक्ष नि अनास्थेची स्थिती

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...९७