पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षण घेतल्यावर सेंट पॉल शाळेत घालण्यात आले. यावेळी डॉ. कृष्णधन घोष यांनी या मुलांची भारतीय लोकांशी किंवा भारतातील घडामोडींशी परिचय होऊ नये म्हणून सक्त सूचना ड्रेवेट दांपत्याला दिल्या होत्या. येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर अरविंदांनी वयाच्या सतराव्या वर्षी सीनिअर स्कॉलरशिप संपादन करत केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. याकाळात त्यांनी इंग्रजी भाषेबरोबर फ्रेंच भाषा, वाङ्मय आणि युरोपच्या इतिहासाचे अध्ययन केले. त्यांनी इटालियन आणि जर्मन भाषाही अवगत करून घेतल्या.
 वडिलांच्या सांगण्यावरून अरविंद आय. सी. एस. परीक्षेस बसले. या परीक्षेत यशस्वीही झाले. इथपर्यंत सर्वकाही व्यवस्थित होते; परंतु शेवटची घोड्यावर बसण्याची चाचणी त्यांनी दिली नाही. आणि आपण या सेवेसाठी पात्र असलो तरी ही गुलामीची नोकरी करू इच्छित नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. या अगोदर शिक्षण काळात भारतीय लोक, इंग्रजांच्या अधिपत्याखालील गुलामगिरी आणि इंग्रजांची मुजोरी याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती. यामुळेच हातात प्रतिष्ठित नोकरी असतानासुद्धा त्यांनी ती नाकारली. राष्ट्रप्रेमातून त्यांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. त्यामध्ये अनेकांना सक्रिय केले.
 अशातच त्यांची भेट स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी झाली. त्यांना या महान नृपतीचे दर्शन घडताच इंग्रजांच्या गुलामगिरीपेक्षा बडोदे सरकारची

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / ७