पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव ज्ञानमाला निर्मितीमागील भूमिका

 महाराजा सयाजीराव गायकवाड हे फक्त आधुनिक भारतातील सगळ्यात प्रागतिक राजे होते असे नाही तर भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाचे 'बौद्धिक नेतृत्व'च होते. धर्म, जात, तत्त्वज्ञान, शिक्षण, दातृत्त्व, संशोधन, शेती, उद्योग, आरोग्य, क्रीडा, साहित्य, संस्कृती, ललित कला, प्राच्यविद्या, पुरातत्त्व, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वातंत्र्यलढा इ. मानवी समाजाच्या सर्व अंगांना कवेत घेणाऱ्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेले मानदंड आजही भारतासाठी आदर्श आहेत. त्यामुळे ते आधुनिक भारताचे निर्माते आणि म्हणूनच खरेखुरे 'महानायक' सुद्धा आहेत.
 महापुरुषांचे चिंतन हे फक्त इतिहासाच्या स्वप्नरंजनासाठी किंवा इतिहासाचा पोकळ अभिमान बाळगण्यासाठी करायचे नसते. आपल्या समकालीन जगण्यातील समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी, आपला जीवनसंघर्ष सकारात्मक करण्यासाठीसुद्धा या महापुरुषांचे पुनर्वाचन आवश्यक असते. इतिहास जितका वस्तुनिष्ठपणे आपण वर्तमानाशी जोडू तितका आपल्या समाजाचा भविष्यवेध आपल्याला अचूकपणे घेता येईल.
 महाराजा सयाजीरावांचा 'उदोउदो' करण्यासाठी महाराजा सयाजीराव ज्ञानमालेची निर्मिती केलेली नाही. आजच्या आपल्या धार्मिक आणि जातीय संघर्षावर, शेती- उद्योगातील संकटांवर मात करण्यासाठी तसेच समाज म्हणून आपल्यातील 'विसंवाद' कमी करून 'सुसंवाद' वाढवण्याच्या व्यापक भूमिकेतून ही महाराजा सयाजीराव ज्ञानमाला आकाराला आली. या निमित्ताने आपला तुटलेला इतिहास 'जोडून' वाचण्याची आणि त्यातून संवादाचे पूल उभारण्याची प्रेरणा सर्वांना मिळेल एवढे मात्र नक्की.

पहिल्या टप्प्यात साठ ई-बुक झाले आहेत.
दिनेश पाटील

संपादक महाराजा सयाजीराव

ज्ञानमाला ई बुक प्रकल्प

बाबा भांड सचिव महाराजा सयाजीराव गायकवाड

सं. आणि प्र. संस्था, औरंगाबाद