पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य निर्मितीचे बीजारोपण
 अरविंद घोष यांचा मूळ पिंडच क्रांतिकारी आणि साहित्यिक होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे अरविंद घोष आणि बडोद्यातील साहित्यिक यांच्या वारंवार चर्चा होत. आज देशाला कोणत्या साहित्याची नितांत आवश्यकता आहे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे बडोदा दरबारात दाखल झाल्यावर (८ फेब्रुवारी १८९३) अरविंदांनी चार महिन्यांतच 'इंदुप्रकाश'मधून धारधार लेखमाला लिहिली. पुढे त्यांनी बंकिमचंद्र यांच्यावरील लेखमाला लिहिली. त्यांनी बंगाली, मराठी व गुजराथी भाषांचा अभ्यास केला. त्यांनी पुढे 'सावित्री' नावाचे जे महाकाव्य निर्माण केले त्याची पायाभरणी बडोद्यात झाली होती. चोवीस हजार पद्यपंक्तीत विस्तारलेले व आकारमानाने मिल्टनच्या विश्वविख्यात महाकाव्याच्या दुप्पट असणारे विशाल, रसाळ व प्रासादिक काव्य पुढे वेदपुरीस (पांडेचरी) पूर्ण केले.
बडोद्याला निरोप
 इंग्लंडमध्ये असल्यापासून अरविंद घोष यांना राष्ट्रीय चळवळीविषयी आकर्षण वाटत होते. पुढे हिंदुस्थानात आल्यावर त्याकडे त्यांचा अधिकच ओढा वाढला. त्यांनी काही काळ बडोद्यात राहून हे कार्य करण्याचे ठरवले. परंतु त्याचा त्रास त्यांच्यापेक्षा नृपती सयाजीराव महाराजांना जास्त होऊ लागला.

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १६