Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांनी १८७५ मध्ये बडोद्याच्या गादीवर आल्यापासून अस्पृश्योद्धारासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेतल्यास हरिजन सेवक संघाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची त्याच्या स्थापनेआधीच बडोद्यामध्ये पूर्ती झाली होती असा निष्कर्ष निघतो. या संदर्भात सयाजीरावांच्या अस्पृश्यविषयक कार्याबद्दल महात्मा गांधींनी महाराजांचे केलेले अभिनंदन हा याचा उत्तम पुरावा आहे. ८ मार्च १९३३ रोजी येरवडा सेंट्रल जेलमधून सयाजीरावांना पाठवलेल्या पत्रात गांधी लिहितात, “महाराज आपण बडोदा संस्थानात हरिजनांसाठी शिक्षणाची दार उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक कायद्याने पुसून या कामाची कायद्याने अंमलबजावणी केली. आपल्या या लोकोत्तर कामासाठीच आपण सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहात, हे कबूल करताना माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.”

 गांधीजींचे वरील विधान भारतातील अस्पृश्य मुक्तीच्या इतिहासातील सयाजीरावांचे पथदर्शक स्थान स्पष्ट करते. गांधीजी वरील पत्रात जेव्हा म्हणतात, 'आपण सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहात' तेव्हा भारतातील गांधींसह अस्पृश्योद्धाराचे काम करणाऱ्या सर्वच समाजधुरिणांना सयाजीरावांच्या कामाने प्रेरणा दिली होती हेच अधोरेखित करतात. परंतु अस्पृश्य उद्धाराच्या अधिकृत इतिहासात विठ्ठल रामजी शिंदे वगळता एकाही इतिहासकाराने सयाजीरावांची दखल घेतलेली नाही.

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १८