पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचा खेद वाटतो. श्री. गांधी यांनी उपोषणाचा आग्रह धरू नये, त्यांच्या त्यागामुळे काहीही साध्य होणार नाही.” सयाजीरावांच्या पत्रातून गांधी-आंबेडकर संघर्षात महाराजांची भूमिका किती सुस्पष्ट होती आणि जातीय विषमता अंताबाबत त्यांची भूमिका किती व्यापक होती हे स्पष्ट होते.
हरिजन सेवक संघ
 विशेष म्हणजे सयाजीरावांच्या या पत्रानंतर आठच दिवसांनंतर ३० सप्टेंबर १९३२ रोजी पुणे कराराच्या अंमलबजावणीचे पहिले पाऊल म्हणून मुंबई येथे 'अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी लीग'ची स्थापना करण्यात आली. पुढे या लीगचे 'हरिजन सेवक संघ' असे नामकरण करून दिल्ली येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. या संस्थेच्या स्थापनेवेळी पुढील ३ मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती.
 १) अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू समाजाच्या सर्व घटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे आणि हिंदू जातींच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणणे.
 २) अस्पृश्य जातींच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य करणे.

 ३) शक्य तितक्या लवकर सर्व सार्वजनिक विहिरी, धर्मशाळा, रस्ते, शाळा, स्मशानभूमी आणि मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे.

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / १७