संवादी वातावरण पुन्हा निर्माण करून बंद झालेली चर्चा सुरू करण्याची विनंती १४ सप्टेंबर १९३१ रोजी सयाजीरावांनी सभागृहाला 'केली. परंतु त्यावेळी कोणीही त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. २१ सप्टेंबर १९३१ रोजी सयाजीरावांनी सभागृहाला संबोधित केले. त्यानंतर ४ दिवसांनी २५ सप्टेंबर रोजी लंडनच्या डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये महात्मा गांधींनी महाराजांची भेट घेतली. या भेटीत गोलमेज परिषद व अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ज्वलंत प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी. सयाजीरावांच्या खंबीर आणि सक्रिय पाठिंब्याची खात्री असल्यामुळेच गोलमेज परिषदेसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी गांधींनी त्यांची स्वतःहून भेट घेतली हे निश्चित.
पुणे करार
स्वातंत्र्यपूर्वकालीन अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारविषयक चर्चेत गांधी-आंबेडकर पुणे कराराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाबाबतच्या वादासंदर्भात २२ सप्टेंबर १९३२ रोजी टाटा सन्स अँड कंपनीच्या ए.डी. नौरोजी यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, “तुमची तार मिळाली. मला वाटते की, तथाकथित उच्च हिंदू त्यांनी वागायला हवे, तसे वागत नाही. त्यांनी अस्पृश्यता पूर्णपणे दूर केली पाहिजे. हिंदुत्वामध्ये दुही टाळायची असेल तर सर्व जातीतील लोकांना समान संधी द्यायला हवी. डॉ. आंबेडकरांची समजूत घालू शकलो नाही,