पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जगप्रसिध्द कलावंत संगीतकार उस्ताद मौलाबक्ष खाँ, उस्ताद फैजमहंमद खाँ, उस्ताद फैयाज खाँ, गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले, उस्ताद अब्दूल करीम खाँ, अब्दूल हक्क, गायनाचार्य पं. विष्णू भातखंडे, गायनाचार्य पं. विष्णू मिरजकर ( पलुसकर), गायिका लक्ष्मीबाई जाधव बडोदेकर, पं. बालगंधर्व, महान चित्रकार राजा रवी वर्मा, चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, इटालियन मूर्तिकार फेलिची, फॅमटन, महान शिल्पकार कोल्हटकर, अशा महान जगप्रसिध्द कलावंत मंडळींच्या प्रगतीचा पाया बडोद्यात रोवला गेला आहे. हे महाराजा सयाजीराव कलासक्त असल्याचे मोठे उदाहरण होय. साहित्य संगीत कला विहीनः हे बोधवाक्य सयाजीराव महाराजांनी स्वतःच्या राजवटीत सार्थ करून दाखविले.
कलासक्त आणि सुधारणावादी सयाजीराव
 कलासक्त सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत कलावंत खात्याची पुर्नरचना केली. १९२५ मध्ये त्यांनी कलावंत खात्यासाठी नियम आणि या खात्याची स्वतंत्र व्यवस्था या संदर्भात अमंलबजावणी करण्यास सुरुवात केली. यामुळे कलावंत खाते बडोद्याच्या सुधारणेत अग्रस्थानी राहिले आहे. महाराज सयाजीराव हे कला आणि कलावंत यांचे पोशिंदे बनले.

 महाराजांनी १८८८ मध्ये शास्त्रीय शिक्षणाची पुस्तके गुजराथी भाषेत तयार करण्यासाठी ५०,००० रू. (आजची किंमत २०२१ मध्ये १३ कोटी रूपये) रक्कम मंजूर करून त्याबद्दलची सर्व जबाबदारी प्रो. त्रिभुवनदास गज्जर यांच्याकडे सोपवली. या

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ९