पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खाजगी कचेरीत एक कारकून नेमण्यात आला आणि या खात्याची देखरेख खाजगी सरदार यांच्याकडे सोपविण्यात आली.
 पुढे मल्हाररावांनंतर महाराजा सयाजीराव-३ रे यांच्या काळात राजवाडा फौजदार खात्याची स्थापना करण्यात आली आणि सरदारांच्या देखरेखीखाली असलेले सर्व छोटे विभाग एकत्र करून राजवाडा फौजदार यांच्या ताब्यात दिले. त्याबरोबर कलावंत खातेही फौजदार खात्यात गेले. १८९९-१९०० पर्यंत हे खाते तिकडेच होते.

 १८८७ मध्ये सयाजीराव पहिला विदेशी दौरा करून परत आले. यानंतर बडोदा संस्थानची कलाक्षेत्रात अनेकार्थी वृध्दी झाली. १८९७-९८ मध्ये सयाजीरावांनी पाश्चिमात्य संगीत शास्त्राची माहिती करून घेण्यासाठी प्रसिध्द गवई मौलाबक्ष यांचे चिरंजीव अल्लाउद्दीन यांस विलायतेस पाठवले. अल्लाउद्दीन तेथून पाश्चिमात्य संगीताचा अभ्यास करून आल्यावर १९०० मध्ये त्यांना ‘कलावंत सुप्रिन्टेन्डेन्ट' असा हुद्दा देऊन कलावंत खाते स्वतंत्रपणे त्यांच्याकडे सोपविले. १९०० ला स्वतंत्रपणे सुरू झालेले हे खाते १९१२-१३ पर्यंत चालू राहिले. १९१८-१९ मध्ये हे खाते डायरेक्टर ऑफ म्युझिक आणि भारतीय संगीत शाळेचे प्रिन्सिपॉल यांच्या ताब्यात दिले गेले. या खात्याचे कागदपत्र अगदी स्वतंत्रपणे हुजूर हुकमाप्रमाणे ठेवण्यात आले होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ८