पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



महाराजा सयाजीराव
आणि
बडोद्यातील संगीत शिक्षण

 बडोद्यात १८२१ मध्ये थोरले महाराज सयाजीराव गादीवर आल्यावर प्रथम आठ गवई ठेवून कलावंत खात्याची सुरूवात झाली; परंतु खंडेराव महाराजांच्या कारकीर्दीपर्यंत त्याला स्वतंत्र खात्याचे स्वरूप आलेले नव्हते. सर्व गुणिजनांचे म्हणजे सगळ्या कलाकारांचे एकाच खात्यात वर्गीकरण केले असल्यामुळे एकत्रच त्यांचा सर्व हिशेब ठेवला जाई. होनाजी बाळ, सगनभाऊ या प्रसिद्ध शाहिरांना बडोद्याच्या अधिपतींचा भरपूर आश्रय व मदत संस्थानातून मिळत होती. प्रसिद्ध कवी शाहीर अनंत फंदी हे तर बडोद्याचे वतनदार होते. खंडेराव महाराज या गुणिजनांना चांगला आश्रय देत. त्यानंतर राजमाता जमनाबाईसाहेबांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली होती.

 महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. कलावंताचे पगार जे पूर्वी निरनिराळ्या खात्यात जमा होत असत ते एकाच ठिकाणी जमा होण्याची योजना केली गेली. या खात्यासंबंधी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ७