Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जडला. खूप उपचार, औषधपाणी अन् प्रचंड ग्रंथ वाचनानेही या विकारावर आराम वाटेना. त्यांना रात्र रात्र झोप लागत नसे. त्यांना स्वस्थ झोप येण्याकरीता बऱ्याच गायकांना रात्री अंगाईगीत गाण्यासाठी बोलावण्यात येई. तेव्हा कोणालाच यश आले नाही. महाराजांनी कोल्हापूरच्या गायिका लक्ष्मीबाईंचे गायन ऐकले आणि त्यांना चांगली झोप आली. दुसऱ्याच दिवशी दरबार गायिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. महाराजांनी त्यांना भरजरी वस्त्र आणि अलंकार देऊन यथायोग्य सन्मान केला. त्यांना दरबारात येण्यासाठी बग्गीची व्यवस्था

केली होती. बडोद्यातल्या यशस्वी कारकिर्दीमुळे त्या “लक्ष्मीबाई बडोदेकर" याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. प्रयागच्या संगीत परिषदेतही त्यांचे गायन गाजले. शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटींनी त्यांना 'संगीत चंद्रिका' ही पदवी बहाल केली होती. तसेच त्यावेळी लक्ष्मीबाईंच्या गायनांच्या ग्रामोफोनमध्ये अनेक रेकॉर्ड्स निघाल्या. त्यावरून त्यांच्या सुरेल व मधुर गायनाची कल्पना येते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३०