पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वरलिपी निर्माण करून त्या लिपीत काही गीते प्रसिद्ध केली होती. त्यांच्या हयातीत संगीत शाळा ठीक चालली होती. नंतर ती ओस पडली व महाराजांना तिच्या भविष्याविषयी चिंता वाटू लागली. संगीत संशोधक पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्या कार्याची
माहिती महाराजांपर्यंत पोहचली होती. महाराजांनी संगीत शास्त्राचा अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यासाठी भातखंडेंना या संगीत महाविद्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार भातखंडे १९१५ मध्ये बडोद्यात आले. त्यांनी या संगीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात बरेच बदल करून नोटेशनची पुस्तके तयार करून दिली आणि ती बडोदा सरकारने छापली.

 विष्णू नारायण भातखंडे हे हिंदुस्थानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. बडोद्यात भातखंडे व महाराजांच्या काही भेटी झाल्या. या भेटीदरम्यान त्यांच्यात भारतीय संगीत या विषयावर चर्चा होत असे. एका भेटीत भातखंडेंनी महाराजांना अखिल भारतीय संगीत परिषद भरवण्याची कल्पना सुचविली.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २१