पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १८९४ साली उस्ताद अलिया-फत्तु खाँ, पतियाला महाराजांची शिफारस घेऊन बडोद्यास आले. उस्ताद अलिया- फत्तु खाँना मैफीलीत वेडेवाकडे हातवारे करण्याची सवय होती. पण महाराज शिस्तप्रिय असल्याने त्यांना हे प्रकार आवडणार नाहीत याची कल्पना दरबारातून या गवयांना देण्यात आली. त्यानंतर महाराजांसमोर अलिया-फत्तु खाँपैकी अलिया खाँची बडोद्यात लागोपाठ सकाळी, संध्याकाळी, रात्री अशी तीन गाणी झाली. मात्र ही गाणी त्यांच्या ख्यातीप्रमाणे जमली नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांच्या सवयीवर दरबाराने घातलेले बंधन.

 महाराजांच्या शिस्तप्रिय स्वभावातून हे महान गायकही सुटले नाहीत. अदब राखून गाणे सादर करणे हे शिष्टाचाराला धरून व्हावे; ह्या गोष्टीला बडोदा दरबारी सर्वांत वरचे स्थान होते. त्यांचे गाणे संपल्यावर महाराजांनी दिवाणांना जवळ बोलावून विचारले की आपल्या दरबारात कोणी असे गाऊ शकेल का? गवयांच्या प्रथेनुसार महान गायकांच्यावर कुणी गायचे नसते. त्यामुळे दरबारात मौलाबक्ष खाँ आणि फैजमहंमद खाँनीही महाराजांना हात जोडून नकार दर्शवला. त्यामुळे महाराज नाराज झाले आणि त्यांनी अब्दुल करीम व अब्दुल हक्कला गाण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार दोघा भावांनी बहारदार गाणे पेश केले. त्यांची नम्रता आणि पेशकश पाहून महाराजांना खूप आनंद झाला. सयाजीरावांनी त्यावेळी केलेल्या भाषणात त्या दोघांचे भरभरून कौतुक केले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १७