पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यापूर्वी १८८४ साली मौलाबक्षांच्या शाळेचा वार्षिक समारंभ झाला. समारंभाचे अध्यक्ष गजाननराव भाटवडेकर सरसुभे हे होते. बडोद्यातली गायन-वादनातली सर्व मातब्बर मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. भास्कर बखले यांचेही त्यावेळी गायन झाले. भास्करबुवांच्या खड्या आवाजाने सर्वांची मनं जिंकून घेतली होती. 'सयाजी - विजय' पत्रकात या कार्यक्रमाचे वृत्त छापले होते. ‘किर्लोस्कर कंपनी' चा मुक्काम त्यावेळी पनवेलला होता. त्यावेळी तालीम सुरू असलेल्या राम-राज्य - वियोग या नाटकातील प्रमुख भुमिका गायक नट भाऊराव कोल्हटकर हे बडोद्याचे होते. त्यामुळे सयाजी- विजय वृत्तपत्र भाऊराव कोल्हटकरांतर्फे किर्लोस्कर कंपनीत नियमित येत असे. या योगामुळे बडोद्यातील मौलाबक्षांच्या शाळेचे बक्षीस समारंभाचे वृत्त आणि किशोर गायक भास्कर बखले यांच्या असामान्य गाण्याचे वर्णन अण्णासाहेब व भाऊराव कोल्हटकरांच्या वाचनात आले होते.
पंडीत विष्णू दिगंबर मिरजकर (पलुसकर) बडोद्यात

 भारतीय गायन संस्कृतीमध्ये प्रसिध्द असलेले विष्णू दिगंबर मिरजकर ( पलुसकर) हे बडोद्याला असताना घडलेला एक प्रसंग. राजमाता जमनाबाईंच्या इच्छेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या रात्री दरबारच्या गुणिजनखात्यातल्या सर्व गवय्ये आणि वादकांची शिवमंदिरात एक मोठी मैफील भरली. या मैफीलीत मिरजकरबुवांनीही गायन करावे अशी जमनाबाईंची इच्छा होती.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / १३