पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वंचित विकास : वैश्विक पार्श्वभूमी


 दलित, अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, परित्यक्ता, विधवा, वेश्या, कुमारी माता, हुंडाबळी, बलात्कारित भगिनी इत्यादी सर्व प्रकारच्या वंचितांच्या कल्याण आणि विकासाचा विचार हा खरा तर मानवी कल्याण आणि विकासाचा विचार होय. मानवी जीवन जसजसे विकसित होत गेले तसतसे ते एका अर्थाने जटिलही होत गेले. विकास, सुधारणा इत्यादींच्या नावाखाली समाजात स्थित्यंतरे आली. या स्थित्यंतरांनी मानवी जीवनात नवनव्या समस्यांची भरही घातली. मनुष्य एका संकटातून मुक्त झाला की दुसरे नवे संकट, समस्या त्याच्यापुढे दत्त म्हणून उभ्या राहतात.

 दया, करुणा, कणव, साहाय्य, भूतदयांसारख्या प्रवृत्तींनी माणसास इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले. उत्क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात या प्रवृत्तींची व्याख्या जरी झाली नसली तरी या सर्व वृत्ती माणसात कार्यरत होत्या, हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध करता येईल. मूळ मानवी सत्प्रवृत्ती नि सदाचारास पुढे धर्माचे रूप आले. दुर्बलांची दया, अपंगांना साहाय्य, रंजल्या-गांजल्यांची सेवा यांसारख्या गोष्टी धर्माचार मानल्या गेल्या. मानवी समाजातील मांगल्याच्या रक्षणासाठी अधर्म, अनीतीच्या कल्पना उदयास येऊन असे वर्तन धर्मबाह्य, समाजहितविरोधी मानले गेले. सदाचार नियमनासाठी दंडविधानही उदयास आले. अशा नानाविध स्थित्यंतरांतूनही मानवी जीवन संकटमुक्त होऊ शकले नाही. धर्मपीठे आपले पावित्र्य राखू शकली नाहीत. परिणामी धर्माची जागा राज्यसत्तेने घेतली. राज्यसत्ता हे प्रजाहितापेक्षा अहंकार, पुरुषार्थ, साहस आणि अधिकारवृत्ती प्रदर्शनाचे साधन बनले. एकाधिकारवृत्तीच्या वाढत्या स्तोमापुढे

मराठी वंचित साहित्य/७