पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दलित साहित्य करताना दिसत नाही. वर्तमानात भूतकाळाचे स्मरणरंजन किंवा शोक - संताप हा कोणत्याच मनुष्यसमाजास क्रांतदर्शी बनवित नाही. नव्या अस्मिता, नवी स्वप्ने, नवी जीवनशैली, समाजाच्या वरच्या थरात स्थलांतर ही दलित समाज व साहित्यापुढील आव्हाने आहेत. ती एकविसाव्या शतकातील दलित साहित्यिक कसे पेलतात यावर त्याचा चेहरा ठरेल. एकमात्र खरे, ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा' ही विकासाची त्रिसूत्री एकविसाव्या शतकात ‘शिका, बदला व विकसित व्हा' राहील, तर दलित समाजाचा अभ्युदय झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार रुजवणे व तसे लेखन करणे हे नव्या दलित साहित्यापुढचे आव्हान राहील असे वाटते.

 गेल्या शतकाअखेरपर्यंतच्या स्त्रीवादी मराठी साहित्याच्या नव्या आव्हानांसंदर्भात विचार करताना दिसून येतो की, गतशतक हे स्त्रीवादी विकासाचे होते. एकविसावे शतक हे त्याच्या प्रगल्भतेचे सिद्ध करण्याचे आव्हान आहे. विसाव्या शतकात स्त्रियांचा झालेला शैक्षणिक विकास, प्राप्त विविध संधी, सवलती, हक्क, अधिकार, आरक्षण यांमुळे ती झपाट्याने अर्थार्जन करणारी स्वतंत्र व्यक्ती बनली. या स्वातंत्र्याने स्त्रीविकासास नित्यनवे धुमारे फुटले आहेत. स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. हुंडाबळी, घटस्फोट, परित्यक्ता, विधवा, देवदासींचे प्रश्न भविष्यात नसतील असे नाही; पण त्यांची तीव्रता खचीतच कमी झाली असेल. विसावे शतक स्त्रीसाहित्याच्या दृष्टीने अश्रूनी भिजलेले होते खरे. भविष्यात ते स्वश्रमाने, स्वखेदाने उन्नत असल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक नवे बदल नवे प्रश्न घेऊन येत असतात. भारतीय समाजात स्त्रीस युरोपाप्रमाणे गृह-मुक्त होता येणार नाही. उंब-याबाहेरच्या जीवनात स्वकर्तृत्व सिद्ध करणे व उंब-याच्या आत गृहकार्य, कुटुंब जबाबदा-या पेलणे ही कसरत ती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात करीत राहिली. एकविसाव्या शतकात स्त्रीवादी साहित्यापुढचे खरे आव्हान भारतीय पुरुष मानसिकता बदलणे, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील गतशतकातील भावुकता कमी करून ती वास्तववादी, व्यवहारी करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होणार असल्याने तशा नायिका निर्माण करणे काळाची गरज आहे. गृहकार्यदक्ष पुरुष पात्रांचे उदात्तीकरणही समांतर होत राहील तर स्त्रीची कसरत कमी होऊन ती करिअरिस्ट पण होईल व कुटुंबवत्सलही! स्थलांतरण, संघर्ष, विवाह, सहजीवन, लिव्ह इन रिलेशनशिप, प्रवास, मैत्री असे नव्या काळाचे कळीचे मुद्दे होत. भारतीय समाजजीवनात याचे संघर्ष रोज पाहण्यास मिळत आहेत. शिक्षणाने व स्वातंत्र्याने हाती आलेले नवे जग आणि जीवन स्त्री आत्मकेंद्रित पद्धतीने उपभोगते की जगजाणिवेने पेलते यावर

मराठी वंचित साहित्य/७८