पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मराठी वंचित साहित्यापुढील आव्हाने


 आज मराठी वंचित साहित्यापुढील आव्हान हे जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण यांतून जे सामाजिक परिवर्तन घडून येत आहे, त्यात खेड्यांचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. परिणामी शेती व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पूर्वी शेती ही नैसर्गिक होती व ग्रामजीवन व संस्कृती पारंपरिक. आज शेती यांत्रिक होते आहे व ग्रामजीवन आणि संस्कृती आधुनिक बनत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण प्रश्न व समस्या बदलत आहेत. वर्तमान मराठी ग्रामीण साहित्यापुढील आव्हान नवे बदल प्रतिबिंबित करण्याचे आहे. खेड्यांचे कितीही आधुनिकीकरण, नागरीकरण होत राहिले तरी खेड्यांचे अस्तित्व काही लोप पावणार नाही. शहर व खेडे यांत स्थळ, काळ, स्थिती, भाषा, संस्कृती, मर्यादांचे अंतर आणि फरक राहणारच. आजमितीस शेतीतून जनावरे हद्दपार होत आहेत. घरोघरी पारंपरिक शेती व्यवसायातून माणूस दुरावला जातो आहे. स्त्रियांच्या शिक्षणप्रसाराने त्यांचा ओढा अकृषक कार्यांकडे आहे. श्रमाचे काम करणे अप्रतिष्ठेचे व दुय्यम ठरते आहे, हा वर्तमान ग्रामीण जीवनापुढचा खरा यक्षप्रश्न आहे. खेडी सहकारातून समृद्ध होत होती. ती सहकार चळवळ आज मोडकळीस आली असून, त्यांची जागा खासगी कंपन्या घेत आहेत. त्यामुळे आज शासकीय पीकहमी, सवलती, किफायती दर, कर्जमाफी यांमुळे किफायतशीर शेती करणे भविष्यकाळात अनिवार्य होईल. तिथेही कंपन्या आल्या तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे ग्रामीण अस्तित्व ज्या माती, मन व माणसावर उभे होते, तेच लयाला जाईल काय, अशी साधार भीती वाटते. खेड्यांचे राजकीयकरण, शिक्षणप्रसाराने वाढती सुशिक्षित बेकार युवकांची फौज यांमुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत.

मराठी वंचित साहित्य/७६