पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्तीची जी गती आहे, ती पश्चिम बंगाल, केरळसारख्या पुढारलेल्या प्रांतांसारखी आहे. मराठी नाटक व रंगभूमीचा विचार करता तिच्यात जी व्यावसायिक सफलता दिसते, तशी ती अन्यत्र अपवादाने दिसते. पैसे देऊन, तिकीट काढून नाटक पाहण्याची मराठी परंपरा हिंदीत १९८६ पर्यंत नव्हती. कारण तोवर तिथे नाट्यगृहेच नव्हती. हौशी नाटके होत; पण त्यात प्रेक्षक निर्मितीची क्षमता अल्प होती. कर्नाटकात नाटकांची चळवळ दिसते तशी ती पश्चिम बंगालमध्येही. त्यामुळे अभिनय, मंचन, विषय, प्रयोग (नव नवे विषय, आशय, सादरीकरणाची तंत्रे इत्यादी) इत्यादींची मराठी नाटकाची मोहिनी साध्या भारतावर राहत आली आहे. विशेषतः विजय तेंडुलकरांची नाटके यांसंदर्भात राष्ट्रीय नाटके झाली ती भाषांतर, प्रयोग इत्यादींमुळे.
 मराठी कथांपेक्षा कादंब-यांची भाषांतरे भारतीय भाषांत अधिक प्रमाणात झाली, ती तिच्यातील सामाजिक पुरोगामीपणा, सामाजिक प्रश्न, मानवी संस्कृती उन्नयन, भारतीय मिथकांचा वापर इत्यादींमुळे. या संदर्भात कादंबरीकार वि. स. खांडेकरांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या जवळजवळ सर्व कादंब-यांची भाषांतरे अन्य भाषांत झाली. गुजराथी आणि तमीळ भाषेत तर खांडेकर त्याच भाषेतील लेखक म्हणून ओळखले जातात. इतकेच नव्हे तर त्यांच्या कादंबच्यातील सुभाषिते, विचार त्या भाषेचे विचार म्हणून भाषण, संभाषणात वापरले जातात. असेच यश शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय'ला मिळाले होते. ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार तिला लाभला होता. राष्ट्रीय स्तरावर गेलेले आणखी दोन मराठी साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर. त्यांच्या कवितांची भाषांतरे अनेक भारतीय भाषांत दिसून येतात. वरील सर्व साहित्यकारांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचे हिंदी, इंग्रजी अनुवाद हेही त्यांच्या राष्ट्रीय बनण्याचे एक कारण होय. डॉ. भालचंद्र नेमाडेंची 'हिंदू' कादंबरी नुकतीच हिंदीत आली आहे.

 मराठी साहित्याचे पुरोगामीपण ही एक गोष्ट दर्जाच्या संदर्भात विचारात घ्यावी लागेल. मराठी समाजाचे पाश्चात्त्यीकरण जितक्या गतीने व व्याप्तीने होते, त्याची तुलना केरळ, गुजरात, पंजाब प्रांतांशी होऊ शकेल. गोवा, पुडुचेरी, बंगालशीही काही प्रमाणात. बालविवाह, विधवा विवाह, सतीप्रथा, इत्यादी चळवळी व सुधारणांमुळे इथे स्त्रीशिक्षण प्रसार रुजला. दलित, वंचितांप्रती आस्था हाही आधुनिक मानसिकतेमुळे आला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, ‘सुधारक'कार, आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन, कार्य व विचार त्यास कारणीभूत होती. शिवाय महाराष्ट्रात संस्थांचे जाळे असणे हेही समूह

मराठी वंचित साहित्य/७४