पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मराठी वंचित साहित्याचा दर्जा


 कोणत्याही साहित्याच्या दर्जाचा विचार करता असताना स्थूलतः तो राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय साहित्याच्या संदर्भात अथवा तुलनेने ठरतो. भारतीय साहित्यात मराठी भाषेने जे योगदान दिले आहे, ते वंचित साहित्य आणि नाटक या संदर्भात अधिक मोलाचे ठरते. मराठीत ग्रामीण, दलित, महिला आणि वंचित साहित्याचा मोठा प्रभाव आहे आणि योगदानही. मराठी साहित्यातील आत्मकथने अन्य भारतीय साहित्य आणि भाषांच्या तुलनेने श्रेष्ठ ठरतात. हिंदीत तर मराठीकडून प्रेरणा घेऊन दलित साहित्यलेखनाची परंपरा सुरू झाली. ती काळाच्या रूपात पारखून घेता येणे शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की, उत्तरेकडील भाषांत जे साहित्य आहे त्यात स्वत:बद्दल लिहिण्याचा प्रघात कमी दिसतो. त्यामागे आत्मश्लाघा वृत्ती दिसून येते. उलटपक्षी मराठी साहित्याच्या प्रमुख प्रवृत्तीत एक प्रकारची आत्मरत वृत्ती व आत्मकेंद्रित दिसते. महाराष्ट्रात झालेली सुधारणा चळवळ, साहित्यात झालेली मोठ्या प्रमाणातली भाषांतरे, शिक्षणप्रसार, स्त्रीस्वातंत्र्य यांमुळे इथे लेखनात एक प्रकारची नि:संकोचता दिसते, ती हिंदी साहित्यात आढळत नाही. इथे हिंदीस आलेलं राष्ट्रीय रूप, शिवाय हिंदीत सर्व भारतीय भाषा व साहित्याची भाषांतरे साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय ज्ञानपीठ, अन्य प्रकाशन प्रकल्प, संस्थांमुळे मोठ्या प्रमाणात होत असतात, हे लक्षात घ्यायला हवे.

 मराठी भाषेची राज्य सीमा, सीमित वाचकसंख्या हेही दर्जा ठरवत असताना आपण विचारात घेणे आवश्यक आहे. मराठी, दलित, ग्रामीण, महिला आणि वंचित साहित्यप्रवाहांचा विचार करता इथे जात, धर्म, परंपरांतून

मराठी वंचित साहित्य/७३