पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विभावरी शिरूरकर, शांता निसळ, शशिकला जाधव या साहित्यिक भगिनींचं सारं साहित्य म्हणजे पीडित, वंचित, परित्यक्त मुली व महिलांचा आक्रोश! गोदावरी परुळेकरांचं ‘जेव्हा माणूस जागा होतो', डॉ. शरच्चंद्र गोखले यांची ‘निर्वासितांचा प्रश्न', ‘नावडती मुले', 'अपंगांची हाक', 'जगावेगळे जग', ‘म्हातारपण' ही पुस्तके, महर्षी कर्वे यांचं ‘आत्मवृत्त' प्रकाशित होत आता वंचितच स्वतः लिहू लागले. त्यांच्या साहित्यांवर समीक्षाग्रंथ, संशोधन प्रबंध, पदव्या झाल्या तरी जर आपण वंचित साहित्यप्रवाह म्हणून स्वीकारणार नसू तर अशा वर्गाला प्रगल्भ, पुरोगामी कसे म्हणायचे? हा महाराष्ट्र महात्मा फुले, पंडिता रमाबाई, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धों. वि. कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कसा म्हणायचा?

 दलित साहित्याप्रमाणे दलितेतर वंचित साहित्यात आत्मकथा मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेल्या. त्यांची सुरुवात विसाव्या शतकाच्या प्रारंभी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या 'आत्मवृत्त'पासून होते. त्यात त्यांनी विधवा, परित्यक्त महिला व अनाथ मुले त्यांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, पुनर्वसन कार्याचे वर्णन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत मिशनरींनंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एकोणिसाव्या शतकात जे व जसे कार्य केले ते वृद्धिगत करण्याचे श्रेय महर्षी धोंडो केशव कर्वे व त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांना द्यावे लागेल. बाया कर्वे यांचे 'माझे पुराण' (१९४४) ही हृद्य आहे. महर्षी कर्वे यांच्या हिंगण्याच्या अनाथाश्रमात राहन कार्य केलेल्या पार्वतीबाई आठवले यांचे 'माझी कहाणी' (१९२८) आणि कमलाबाई देशपांडे यांचे ‘स्मरणसाखळी' (१९४३) वाचले की त्या काळात वंचितांच्या कल्याणाचे कार्य सनातनी समाजाविरुद्ध उभे राहून करणे किती कठीण होते याची प्रचिती येते. अशा कार्यकर्त्यांच्या आठवणी, चरित्रे यांचे मोठे भांडार मराठी साहित्यात उपलब्ध आहे; पण कार्यकर्त्यांच्या आत्मचरित्र परंपरेत गोदावरी परुळेकरांचे जेव्हा माणूस जागा होतो' (१९७०), अनुताई वाघ यांचे 'कोसबाडच्या टेकडीवरून' (१९८०), सिंधुताई सपकाळांचे ‘मी वनवासी' (१९८९), किरण बेदींचे ‘आय डेअर' (१९९५), हुसेन जमादारांचे ‘जिहाद' (१९९३), अनू भागवतांचे ‘इदं न मम' (१९८६), नसीमा हुरजूकांचे ‘चाकाची खुर्ची (२००१), कुमुदताई रेगेंचे 'वेगळ्या वाटेने जाताना' (२०००), डॉ. सुनीलकुमार लवटेंचे ‘खाली जमीन, वर आकाश' (२००६). यांचा उल्लेख करता येईल. या आत्मचरित्रांतून आदिवासींचे परिवर्तन, आदिवासी मुलांचे आरोग्य व शिक्षण, अनाथांचा सांभाळ, तुरुंगातील बंदिजनांचा विकास, तलाकपीडित मुस्लीम महिलांच्या व्यथा-कथा, कुष्ठपीडितांचे पुनर्वसन, अपंगांचे शिक्षण व

मराठी वंचित साहित्य/६७