पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेने स्त्री-कथांचा जो साठोत्तरी कालखंड सुरू झाला त्यात अनेक स्त्री-कथाकार लिहित्या झाल्या. त्यांनी बदलते स्त्री भावविश्व, स्त्रियांचे नवे प्रश्न, स्त्रीवादी भूमिका आग्रहाने मांडली. शांता किर्लोस्कर - ‘डाक्याची साडी' (१९६१), कमल देसाई ‘रिंग'(१९६५), सरिता पदकी - ‘बारा रामाचं देऊळ' (१९६६), विजया राजाध्यक्ष - ‘अधांतर' (१९६५), 'शोध' (१९७३), छाया दातार - ‘वर्तुळाचा अंत', दीपा गोवारीकर- 'तडा', पद्मिनी बिनीवाले - ‘रानातला दिवा' (१९७८), सानिया - ‘शोध', आशा बगे- 'गारवा' (१९८५), गौरी देशपांडे-‘आहे हे असं आहे' (१९८६), ऊर्मिला पवार-सहावं बोट' (१९८८),नीलम गो-हे - ‘उरल्या कहाण्या' (१९९०), मेघना पेठे-‘आंधळ्याच्या गाई' (२०००) या कथातून स्त्री आत्मशोधाचा स्वर तीव्र झाल्याचे लक्षात येते. यातील स्त्रीपात्रे अगतिक नाहीत. निर्भय, कणखर स्त्रीचं दर्शन या कथांतून होतं.
 एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकात छाया महाजन, माधुरी शानभाग, आशा कर्दळे, जाई निबंकर, विद्या सप्रे, सिसिलिया काव्हलो, प्रतिभा कणेकर, अरुणा ढेरे, नीरजा, प्रज्ञा दया पवार या लेखिका आघाडीच्या म्हणून सांगता येतील. या कालखंडातील कथांतून एलन शोवॉल्टरनी ज्याला 'वाइल्ड झोन' म्हटलं आहे अशा स्त्रीविशिष्ट अनुभवांचं वर्णन आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, मल्टिपल रिलेशनशिपमधून जाणारी ही कथा आजवरचे पुरुष अस्पर्शित विषय साहसाने मांडते. म्हणून ही कथा विशिष्ट स्त्रीवादी कथा बनते. सुमारे २०० स्त्री-कथाकारांचे या काळात लिहिणे हीदेखील स्त्रीविकास खूण होय.
 मराठी स्त्रीवादी कादंबरीची सुरुवात स्त्रीवादी कथेप्रमाणेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे सन १८७३ मध्ये झाली. साळुबाई तांबवेकरांची ‘चंद्रप्रभा विरहवर्णन' ही ती आद्य कादंबरी होय. हिची नायिका शिकलेली, बुद्धिमान, लग्नाचा निर्णय स्वतः करणारी दाखवून काळाच्या संदर्भात क्रांतिकारीच म्हणायला हवी. याच सुमारास गोदावरी पंडित यांनी प्रीतीचा मोबदला' (१८९०) लिहिली. ही एक प्रेमकथा; पण तीत स्त्री नकार देते दाखवून तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे.

 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काशीबाई कानिटकरलिखित ‘रंगराव (१९०३), इंदिराबाई हरिपूरकरांची पहिली आत्मचरित्रात्कम कादंबरी दैवलीला' (१८८५) च्या प्रभावानं लिहिलेली जानकीबाई देसाईंची 'चारूगात्री' या मुळातून वाचल्या की लक्षात येते की, त्यांना कालभान उच्चप्रतीचे होते. त्यांनी ‘सरस वाङ्मय रत्नमाला'च्या माध्यमातून ‘गृहलक्ष्मी' (१९१५), ‘प्रेमळ

मराठी वंचित साहित्य/६०