पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दु:खद स्थिती विशद करणाच्या अनेक कथा लिहिल्या; पण तत्पूर्वी मराठी नियतकालिकांतून स्फुट कथा प्रकाशित होत राहिल्या. उषा लिखित 'आधी लग्न, मग स्वयंवर'(मनोरंजन, नोव्हेंबर-डिसेंबर-१९०१), लक्ष्मीबाई कार्लेकर लिखित 'लग्नकहाणी' (उद्यान, जुलै, १९१५) अशा कथांचा वानगी म्हणून उल्लेख करता येईल. या कथांदीर्घ असंत. संवादशैलीस महत्त्व असे. लक्ष्मीबाई टिळक, कमलाबाई किबे, इंदिराबाई सहस्त्रबुद्धे इत्यादी लेखिका मासिकात लिहीत. पहिल्या महायुद्धानंतर स्त्री-कथासंग्रह प्रकाशनास आरंभ झाला. काशीबाई कानिटकरांचा 'चांदण्यातील गप्पा' (१९२१), गिरिजाबाई केळकर लिखित ‘समाजचित्रे' (भाग १, २) (१९२३, ३४), आनंदीबाई शिर्केचे ‘कथाकुंज' (१९२८), जुईच्या कळ्या' (१९३९), ‘भावनांचे खेळ' (१९४३), ‘कुंजविकास' (१९३४), कमलाबाई टिळकांची ‘हृदयशारदा' (१९३२) अशांतून कथाविकास होत राहिला; पण स्त्रीवादी कथांची क्रांतिकारी सुरुवात मात्र विभावरी शिरूरकरांनी केली तेव्हा त्यांना जिवे मारायची धमकी देण्यात आली. त्यांना नाव बदलून लिहिणे भाग पडले. 'कळ्यांचे नि:श्वास' (१९३३) मधील कथा अथवा 'उमा' (१९६६) ही दीर्घकथा लक्षात ठेवण्यासारखी आहे. या कथांतून त्यांनी तरुण स्त्रियांच्या आयुष्याची माती करणा-या पुरुषांविषयी निर्भयपणे लिहिले आहे. तद्वतच प्रौढ स्त्रियांचा कोंडमारा त्यांनी स्पष्ट केला आहे. त्यानंतरच्या काळात (१९४५ ते १९६०) कुसुमावती देशपांडे या उल्लेखनीय कथाकार. त्यांनी प्रतिभा' पाक्षिकातून कथालेखन सुरू केलं. ‘दीपदान' (१९७१), ‘दीपकळी' (१९४४), ‘मोळी'( १९४४) या कथासंग्रहांतून त्यांनी कथांचा रूढ साचा मोडला. मनोचिकित्सेस महत्त्व दिले. स्त्रीदु:खास महत्त्व देत काव्यात्मक, रेखीव कथा म्हणून तिचे महत्त्व आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात वसुंधरा पटवर्धन यांनी आपलया पंधरा कथासंग्रहांतून स्त्री अनुभूतिप्रधान लेखनाची प्रचिती दिली. बालविधवा, परित्यक्ता, अविवाहितांची दु:खे त्यांनी मांडली. पीडित असूनही चांगुलपणा, माणुसकीवर श्रद्धा ठेवण्याची शिकवण व चित्रण करणा-या त्यांच्या कथा ‘शोध' (१९५४), चेहरा' (१९५८), ‘पिपाणी' (१९६१), ‘अंतरपाट (१९६२),‘प्रतिबिंब' (१९६३), ‘उपासना' (१९६९), 'पैठणी' (१९७९) या संग्रहांत संकलित आहेत. शिरीष पै यांनी याच काळात कथालेखिका म्हणून नावलौकिक संपादिला तो त्यांच्या 'चैत्रपालवी' (१९५२), ‘सुखस्वप्न (१९५७), ‘मंगळसूत्र' (१९६२), 'कांचनबहार' (१९६४), ‘खडकचाफा (१९६४), ‘जुनून' (१९८२) मधील कथांमधून.

मराठी वंचित साहित्य/५९