पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी साहित्यात स्त्रीविषय लेखनाचा प्रारंभ स्त्रीप्रथा विरोधाने झाला. बाबा पद्मनजींची ‘यमुना पर्यटन' (१८५७) कादंबरी. त्यातून त्यांनी तत्कालीन हिंदुस्थानी विधवा स्त्रियांची दुःस्थिती विशद केली. हरिभाऊ आपटे यांनी ‘पण लक्षांत कोण घेतो' (१८९३) कादंबरीतून स्त्री-अत्याचारास वाचा फोडली. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपल्या ब्राह्मणकन्या' मधून (१९३०) सामाजिक नीतिनियम व प्रतिष्ठेच्या रूढ कल्पनांना हादरा देऊन स्त्रीजीवनविषयक आपली सहानुभूतीची भूमिका स्पष्ट केली. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रीसहभागाने स्त्रियांचा समाजकार्यात समूहाने समावेश झाल्याने एक मोठी कोंडी फुटून स्त्रीचे सामाजिक चलनवलन, शिक्षण, नोकरी तशी क्षितिजे विस्तारली. त्यातून स्त्री लिहिती झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेलं पहिलं स्त्री आत्मकथनं ‘आमच्या आयुष्यातील आठवणी सन १९१० मध्ये लिहून रमाबाई रानडे यांनी आश्वासक सुरुवात केली.
 मराठी स्त्रियांची आत्मचरित्रे हा स्त्रीजीवन समजण्याचा व त्यांच्या मर्मबंधातील आठवणींचा खजिना. त्यातून त्यांनी आपले जे जीवनानुभव, आठवणी, विकास आलेख मांडला आहे, तो वाचीत असताना लक्षात येते की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या जाचातून स्त्रीने स्वविकासाचा जो सोपान निर्माण केला तो पुरुषी उदारतेपेक्षा त्यांच्या स्वभाव व आत्मशोधाचाच प्रवास होय. पार्वतीबाई आठले- 'माझी कहाणी' (१९२८), लक्ष्मीबाई टिळक‘स्मृतिचित्रे' (१९३४), आनंदीबाई कर्वे - ‘माझे पुराण' (१९४४), रोहिणी भाटे - 'माझी नृत्यसाधना' (१९५०), गिरिजा केळकर - ‘द्रौपदीची थाळी' (१९५९), सत्यभामाबाई सुखात्मे - ‘गेले ते दिवस' (१९६५), शीलवती केतकर - मीच हे सांगितलं पाहिजे' (१९६९), गोदावरी परुळेकर - ‘जेव्हा माणूस जागा होतो' (१९७०), आनंदीबाई शिर्के - ‘सांजवात' (१९७२),आनंदीबाई विजापुर-‘अजुनी चालतेची वाट' (१९७२), हंसा वाडकर‘सांगत्ये ऐका' (१९७२), 'मी दुर्गा खोटे' (१९८२), सुनीता देशपांडे-‘आहे मनोहर तरी' (१९९०), माधवी देसाई - ‘नाच गं घुमा' (१९९०), विजया मेहता - ‘झिम्मा' (२०१३) या नि अशा अनेक आत्मकथनांतून स्त्री आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेत आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

 आत्मकथनांप्रमाणेच कथा, कादंब-यांतूनही स्त्री-लेखिका स्त्रीवादी भूमिका मांडताना दिसतात. त्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी सुरू झाल्याचे दिसते. मासिक मनोरंजनात सन १८९६ मध्ये प्रकाशित शांताबाई यांची ‘बिचारी आनंदीबाई' ही प्रसिद्ध झालेली कथा स्त्रीवादी आद्य मराठी कथा होय. त्यानंतर विभावरी शिरूरकरांनी या संदर्भात वंचित स्त्रियांची

मराठी वंचित साहित्य/५८